सोलापूर : जिल्हा परिषद अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया आज दुपारी पार पडणार आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं बहुमत मिळवंण्याचं संख्याबळ असताना देखील भाजप महाआघाडीन चमत्कार घडविण्याचा दावा केला आहे.


भाजप महाआघाडीने राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांचे बंधू आणि अपक्ष म्हणून निवडून आलेले संजय शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने अध्यक्षपदाचा उमेदवार ठरवला नाही. त्यामुळे ही निवडणूक प्रचंड उत्सुकतेची बनली आहे.

संजय शिंदे यांनी जवळपास 44 सदस्यांना गोवा सैर घडवल्याची चर्चा आहे. गोव्याहून हे सगळे सदस्य थेट टेंभुर्णीत संजय शिंदेंच्या फार्म हाऊसवर मुक्कामी  दाखल झाले अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे. आज सकाळी हे सदस्य सोलापुरातील हेरिटेज हॉलला येऊन येथे दुपारी दोन वाजता जि. प. सभागृहात दाखल होणार आहेत.

काँग्रेसच्या सात मतांमध्ये फाटाफूट होऊ नये, यासाठी पक्षाचे निरीक्षक मोहन जोशी सोमवारी सोलापुरात आले होते. त्यांनी बोलावलेल्या बैठकीला काँग्रेसच्या सात सदस्यांपैकी एकही सदस्य हजर नव्हता. भाजपा, काँग्रेस, शेकाप आणि अन्य आघाड्यांचा कौल संजय शिंदे यांच्या बाजूने असल्यामुळे चमत्कार होईल याची  चिन्ह आहेत.

राष्ट्रवादीचे 23, काँग्रेसचे 7, सांगोल्यातील शेकापचे 3 व दीपक साळुंखे यांचे 2 सदस्य फुटले नाही, तरच राष्ट्रवादीला 35 ची मॅजिक फिगर गाठता येईल आणि राष्ट्रवादीचा अध्यक्ष होऊ शकतो.

याला फाटा देऊन संजय शिंदे यांनी 38 ते 42 सदस्यांचा आकडा निश्चित केला आहे. त्यामुळे चमत्कार होईल का, हे पाहणं देखील उत्सुकतेचं बनलं आहे.  काँग्रेस आमदार सिद्धराम म्हेत्रे यांच्या सात सदस्यांचा देखील कौल संजय शिंदे यांच्या बाजूने असल्याचं बोललं जातं आहे. अक्कलकोटचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे पुत्र शिवानंद पाटील (अपक्ष) यांनी काँग्रेसला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.

दुपारी दोन वाजता सभा सुरू होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनिटांचा वेळ दिला जाईल आणि त्यानंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्षासाठी निवडणुका हात वर करून घेतल्या जाणार आहेत. भाजपने महाआघाडीच्या माध्यमातून मिनी मंत्रालयावर झेंडा फडकवण्याचा चंग बांधला आहे. तर राष्ट्रवादी आपला बालेकिल्ला शाबूत ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करते आहे.

68 सदस्यांच्या सोलापूर जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल :

राष्ट्रवादी - 23
काँग्रेस - 7
दीपक साळुंखे व गणपतराव देशमुख - 5
भाजप - 14
शिवसेना - 5
परिचारक गट - 3
शहाजीबापू पाटील - 2
महाडिक गट - 3
समाधान आवताडे गट - 3
संजय शिंदे यांचे - 2
सिद्रामप्पा पाटील गट- १
महाडिक गट- ३
समाधान आवताडे गट- ३
संजय शिंदे गट - २
सिद्रामप्पा पाटील गट- १