Shiv Sena Whip : शिवसेनेच्या व्हिपवरुन (Whip) अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोंधळ होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी काल (26 फेब्रुवारी) आमदारांना व्हिप जारी केला होता आणि व्हिप न पाळल्यास दोन आठवड्यात कारवाई करु, असा इशाराही दिला होता. मात्र शिवसेनेचा व्हिप मिळाला नाही आणि मिळाला तरी पाळणार नाही, अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे. 


अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी शिवसेनेकडून आमदारांना व्हिप जारी करण्यात आला आहे. शिवसेना प्रतोद भरत गोगावले यांच्याकडून व्हिप जारी करण्यात आला आहे. व्हिप न पाळल्यास दोन आठवड्यात कारवाईचा विचार करु, असा इशारा भरत गोगावले यांनी दिला आहे. सर्व आमदारांना अधिवेशनाला पूर्ण वेळ हजर राहण्याचा व्हिप बजावला आहे. सध्यातरी कारवाई होणार नसली तरी ठाकरे गटाच्या आमदारांची चिंता वाढली आहे.


व्हिप बजावला तरी पाळणार नाही : सुनील प्रभू


ठाकरे गटाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू म्हणाले, आम्हाला व्हिप बजावला तरी पाळणार नाही. न्यायालयाच्या आदेशाचा पालन केले नाही तर तो न्यायालयाचा अपमान होईल. गरज पडल्यास आम्ही पुन्हा न्यायालयात जाऊ. सर्वोच्च न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे.  


निवडणूक आयोगाचा निर्णय तरी न्यायालयीन लढाई सुरुच


शिवसेना कोणाची... धनुष्यबाण कोणाचा... हा गेल्या सहा ते सात महिन्यांपासून सर्वत्र प्रश्न विचारला जात होता. मात्र निवडणूक आयोगाने यावर निर्णय दिल्याने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर शिंदे गटाचा दावा पाहायला मिळत आहे. हा जरी निर्णय झाला असला तरी पक्ष पातळीवर अनेक प्रश्नांची उत्तरे अजूनही अनुत्तरीत आहे. त्यावरुनच आता पुन्हा एकदा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठाकरे गटाचे आमदार व्हिप मानणार का? मात्र ही अजून न्यायालयीन लढाई सुरुच आहे. त्यामुळे शिंदे गटाचा व्हिप आम्हाला लागू शकत नाही आणि आम्ही तो स्वीकारणार नाही, अशी भूमिका ठाकरे गटाच्या आमदारांनी घेतली आहे.


व्हिप बजावण्यावरुन पुन्हा एकदा वाद प्रतिवाद


निवडणूक आयोगाने जरी निर्णय दिला असता तरी अनेक मुद्यांवर अजून कुठे ही स्पष्टता नाही.  सर्वोच्च न्यायालयामध्ये संपूर्णपणे हे प्रकरण सुरु आहे. निवडणूक आयोगाने जरी हा निकाल दिला असला तरी सर्वोच्च न्यायालयामध्ये ठाकरे गट पुन्हा जाणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात या निर्णयासाठी वाट बघावी लागणार आहे. मात्र सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि त्यावेळी व्हिप बजावण्यावरुन पुन्हा एकदा वाद प्रतिवाद पाहायला मिळणार आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या :