मुंबई : राज्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. पुणे, सांगली, शिर्डी, बारामती, सिंधुदुर्ग, औरंगाबाद याठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावल्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्यांना दिलासा मिळाला आहे. तर पाऊस सुरु झाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुणे आणि बारातमीमध्ये धो-धो पाऊस पडला आहे. वीजेचा कडकडाट आणि वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. औरंगाबाद शहरात काही भागात पाऊस पडला तर ग्रामीण भागात सोसाट्याचा वारा सुटला होता. उकाड्यानं हैराण झालेल्यांना दिलासा मिळाला असला तरी शेतातल्या उभ्या पिकांच्या चिंतेनं शेतकऱ्यांची झोप देखील उडाली आहे. शिर्डीतही काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली.
पुण्यात विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी
बारामती शहर आणि ग्रामीण भागात जोरदार सोसाट्याचा वारा आणि विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्याने उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. सायंकाळी अचानक ढगाळ वातावरण होऊन जोरदार वाऱ्यासह परिसरात पावसाने हजेरी लावली.
सांगलीत गारांमुळे द्राक्ष पिकाचं मोठं नुकसान
सांगली जिल्ह्यातील पूर्वेकडील अनेक तालुक्यात संध्याकाळी जोरदार वारा आणि गारांसह मुसळधार पाऊस पडला. प्रामुख्याने कवठे महाकाळ, तासगाव तालुक्यातील अनेक गावात मुसळधार पावसाने हजेरी लावली. करोली (एम) ,मनेराजुरी परिसराला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले. यामध्ये अनेक घराचे छप्पर उडाले, झाडे मोडून उन्मळून पडली. गारांमुळे द्राक्ष पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
वैभववाडी तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक भागात गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकाडा काहीसा कमी झाला आहे. दरम्यान वीज पुरवठा काही काळ खंडित झाला होता.
VIDEO | अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता