मुंबई : शिवसेनेने 'आरेला कारे'चा नारा दिल्यानंतर भाजपने आता 'नाणार येणार'ची पुनरुच्चार केला आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावरुन शिवसेनेत नाराजीचं वातावरण तयार झालं आहे. एकदा नाणार जाणारची घोषणा केल्यानंतर परत मुख्यमंत्र्यांनी नाणारचा विषय काढून जनतेच्या मनात असंतोष निर्माण केल्याची भावना शिवसेनेकडून व्यक्त होत आहे.

या विषयावर स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलतील, बाकी कोणीही बोलणार नाही, असं ठरल्याचं कळतं. तसंच आज (18 सप्टेंबर) संध्याकाळी राजापूर परिसरात लोक मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याच्या तयारीत असल्याचं समजतं. त्यामुळे ज्या नाणार प्रकल्पावरुन लोकसभा निवडणुकीला युती झाली होती त्याच नाणारवरुन युती तुटतेय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

नाणार प्रकल्प सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत
महाजनादेश यात्रा रत्नागिरी जिल्ह्यात पोहोचल्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प सुरु करण्याचे संकेत दिले. यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी सकारात्मक घोषणा दिल्या. "आम्ही आधीपासून सांगत होतो नाणारमध्येच रिफायनरी झाली पाहिले. ही रिफायनरी ग्रीन रिफायनरी आहे. या प्रकल्पामुळे कोकणातल्या एक लाख युवकांना रोजगार मिळणार आहे. यामुळे कोकणाचा कायापालट होणार आहे. ज्या प्रकारे याला विरोध झाला त्यामुळे आम्ही हा प्रकल्प थांबवला, मात्र आपला उत्साह पाहिल्यानंतर आता पुन्हा एकदा चर्चा करावी लागेल. आज कुठला निर्णय जाहीर करत नसलो तरी यावर चर्चा केली जाईल," असं मुख्यमंत्री म्हणाले.

नाणार प्रकल्प बंद
18 मे 2017 रोजी नाणार प्रकल्पासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील कारसिंगवेवाडी, सागवे, विल्ये, दत्तवाडी, पालेकरवाडी, कात्रादेवी, कारिवणे, चौके, नाणार, उपळे, पडवे, साखर, तारळ व गोठीवरे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गिर्ये, रामेश्वर येथील जमिनीचे भूसंपादन करण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली होती. 14 गावांतील सुमारे 15 हजार एकर जमिनी यासाठी अधिसूचित करण्यात आल्या होत्या. ही अधिसूचना देखील रद्द करण्यात आली होती.

प्रकल्पक्षेत्रातील 14 ग्रामपंचायतींच्या ग्रामस्थांनी प्रकल्पाविरोधी ठराव मंजूर केले होते. तसंच कोकणातील सर्व आमदार आणि खासदारांनी प्रकल्पाला विरोध केला होता. स्थानिक जनतेने भूसंपादनापूर्वी आवश्यक अशी जमीन मोजणी होऊ दिली नव्हती. शेतकऱ्यांच्या वाढत्या विरोधामुळे अखेर हा प्रकल्प रद्द करण्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली होती.



संबंधित बातम्या

नाणार प्रकल्प रद्द झाल्याची अधिसूचना राजपत्रात प्रकाशित


VIDEO | नाणार रिफायनरी प्रकल्प ग्रामस्थांच्या विरोधामुळे अखेर रद्द | एबीपी माझा


नाणार रिफायनरी प्रकल्प ग्रामस्थांच्या विरोधामुळे अखेर रद्द, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती


नाणार प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होण्याची शक्यता


नाणार रिफायनरी विरोधात कोकणवासीयांचा 'एल्गार' | स्पेशल रिपोर्ट | मुंबई


कणाहीन मुख्यमंत्र्यांना नाणार प्रकल्प लादू देणार नाही : उद्धव ठाकरे