मुंबई : शिवसेना राज्यात लवकरच एक लाख नवे शाखाप्रमुखांची नेमणूक करणार आहे. "माझा महाराष्ट्र...भगवा महाराष्ट्र" या अभियानाअंतर्गत राज्याच्या ग्रामीण भागांमध्ये एक लाख शाखाप्रमुखांची नियुक्ती करण्यात येणार आहे. गावांमध्ये भगवं वातावरणं निर्माण करण्यासाठी प्रत्येक प्रभागात शाखाप्रमुखाची नेमणूक केली जाणार आहे. विशेष म्हणजे शाखाप्रमुखांच्या नियुक्तीवेळी कट्टर शिवसैनिकांना प्राधान्य दिलं जाईल. शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'मध्ये यासंबंधी वृत्त प्रकाशित करण्यात आलं आहे.

शिवसेनेच्या वर्धापनदिनी शिवसेनेचे नेते विश्वनाथ नेरुरकर यांनी या अभियानाविषयी सविस्तर माहिती दिली होती. ते म्हणाले की, "येत्या 27 जुलैआधी शाखाप्रमुखांच्या नेमणुकीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. ही नेमणूक करताना विभागप्रमुखांनी स्वत:चे नातेवाईक नाही तर कट्टर शिवसैनिकांचा विचार करावा, असं उद्धव ठाकरेंचा आदेश आहे. नव्या शाखाप्रमुखांची ओळखपत्रे बनवण्यात येणार आहेत. तसंच ग्रामीण भागात 14 ते 27 जुलै या दरम्यान शिवसेना सदस्य नोंदणी अभियान राबवलं जाणार आहे." आगामी निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी हा कार्यक्रम राबवत असल्याचं विश्वनाथ नेरुरकर यांनी सांगितलं.

कशी होणार शाखाप्रमुखांची निवड?
- महाराष्ट्रातील प्रत्येक गावात शिवसैनिकांची नोंदणी करण्यात येईल.
- प्रत्येक ग्रामपंचायत प्रभागात पुरुष आणि महिला शाखाप्रमुख नेमले जातील.
- ग्रामपंचायतीच्या प्रत्येक वॉर्डात एक उपशाखाप्रमुख नेमण्यात येईल.
- नेमणूक करण्यापूर्वी उमेदवाराकडून शिवसैनिक नोंदणी अर्ज भरुन घेतले जातील.
- शाखाप्रमुख आणि शाखा संघटक पदांवर ज्या शिवसैनिकांची निवड होणार आहे, त्यांचा शिवसैनिक नोंदणी अर्ज छायाचित्रासह 1 ते 7 जुलैपर्यंत शिवसेना भवनात जमा करण्यात येईल.