भाजपमध्ये राक्षसराज, मुख्यमंत्री-पंकजा वादावर शिवसेनेचा टोला
एबीपी माझा वेब टीम | 14 Jul 2016 02:50 AM (IST)
मुंबई : जलसंधारण खात्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यामधील वादात आता शिवसेनेने उडी घेतली आहे. भाजप नेत्यांमधील अंतर्गत धुसफुशीला राक्षसाची उपमा देत शिवसेनेने मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपवर टीका केली आहे. काश्मीरचं खोरं पेटलेलं असतानाही भाजपचा एक आमदार चकार शब्द काढत नाही. मात्र महाराष्ट्रात वेगळंच सुरु आहे. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणा, कुजबुज मोहिमा चालल्या आहेत. पुतळे जाळून निषेध केला जात आहे. पण हे भाजपाअंतर्गत धुमशान आहे. मुख्यमंत्री फक्त भाजपाचे नसून महाराष्ट्राचे आहेत याचे भान ठेवायला हवे. आपणच आपल्या मुख्यमंत्र्यांची बेइज्जत केली तर या अनागोंदीस राक्षसराज म्हणावे लागेल. मुख्यमंत्र्यांना आता अधिक सावधान राहावे लागेल, असं 'सामना'त म्हटलं आहे. 'सामना'त पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसेंवर टीकेचे बाण गोपीनाथ मुंडे यांचाच स्वाभिमानी बाणा दाखवत पंकजाताईंनी सौम्य राडा केला असला तरी मंत्रिमंडळात फेरबदल करणे हा मुख्यमंत्र्यांचाच अधिकार असतो. पंकजाताई अधूनमधून ‘मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल,’ अशी इच्छा व्यक्त करीत असतात, पण मुख्यमंत्री कोणी व्हायचे हा निर्णय आताही दिल्लीतूनच घेतला जातो. त्यामुळे पंकजाताईंनी राजकीय चिंतन करून नवे आडाखे बांधायला हवेत. खडसे यांनाही मुख्यमंत्री व्हायचेच होते व त्यासाठीच त्यांनी शिवसेना-भाजप युती तोडायला लावली. (अशी फुशारकी ते मारतात!) पण आज खडसे घरी आहेत व देवेंद्रभाऊ मुख्यमंत्री आहेत.