मुंबई: आतापर्यंत खासगीत चर्चा असलेल्या 50 कोटींबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जाहीर वक्तव्य केलं आहे. 50 खोके पचणार नाहीत, खोके घेतले म्हणून झोप लागत नाही असंही असं संजय राऊत म्हणाले. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उत्तर दिलं. कसले खोके? मिठाईचा खोका का? असा खोचक सवाल त्यांनी विचारला.


आतापर्यंत गोंजारुन झालं, प्रेमाने सांगून झालं, हक्काने ओरडूनही झालं. पण आता एकनाथ शिंदे यांनी आपली वाट नक्की केल्याने शिवसेनेनं आता त्यांच्यावर आरोपांची सरबत्ती सुरु केली आहे. त्यातला पहिला आरोप आहे लाचखोरीचा. आज शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, "नांदगाव आणि मालेगाववाल्यांना गर्दी बघायला बोलवा. हे 50 खोके वाले नाहीत, पैशांनी निवडणूक जिंकता आली असते तर चित्र बदलले असते. खोके घेतले म्हणून झोप लागत नाही."


एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंड पुकारलं तेव्हा या आमदारांना आमिषापोटी कोट्यवधी रुपयांची लाच दिल्याचा आरोप शिवसेनेतले काही नेते खाजगीत करत होते. हा आकडा 50 कोटी रुपयांपासून ते 80 कोटींपर्यंत गेला होता. पण उघडपणे याबाबत कुणी बोलत नव्हतं.  पण आज खुद्द खासदार संजय राऊत यांनी या कथित लाचखोरीबद्दल शिंदे गटाला सवाल विचारला आहे.


संजय राऊत म्हणाले की, "50 खोके पचणार नाहीत, गुलाबरावचा जुलाबराव होई बघा. उद्धव ठाकरे यांनी जेव्हा वर्षा सोडली तेव्हा महिला रडत होत्या, या अश्रूत गद्दार वाहून जातील."


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रत्युत्तर
खासदार संजय राऊत यांच्या याच आरोपांबाबत दिल्ली दरबारी पोहोचलेल्या एकनाथ शिंदे यांना विचारलं असता त्यांनी या  आरोपांची अत्यंत कमी शब्दात खिल्ली उडवली. कसला खोका? मिठाईचा खोका का? असं ते म्हणाले. 


विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीतही फुटीर आमदारांचा रेट ठरल्याच्या बातम्या होत्या. त्यावरुन घोडेबाजार या शब्दावर काही आमदारांनी आक्षेपही घेतला. तोच घोडेबाजार झाला असल्याचा दावा आता खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आता फक्त घोड्यांच्या जागी शब्द आला आहे खोका.