मुंबई: महाराष्ट्र, पश्चिम बंगालच्या बाबतीत केंद्र काय करतंय हे सर्व देशाला दिसतंय. केंद्राची सूडबुद्धीने कारवाई सुरू असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. हा प्रश्न कायद्याचा आहे, आपण कायद्याच्या माध्यमातून लढू असंही ते म्हणाले.
केंद्रीय यंत्रणांकडून सूडबुद्धीने कारवाई करण्यात येत आहे. नवाब मलिकांची लढाई आता न्यायालयात जाईल, त्याच ठिकाणी काय तो न्याय होईल असंही ते म्हणाले. मनी लॉंड्रिंग प्रकरणी राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना ईडीने आज अटक केली आहे.
अंडरवर्ल्डशी संबंध, त्यांच्याशी संबंधित पैशाचा वापर करणे, हा पैसा परदेशात पाठवणे या आरोपाखाली ईडीने नवाब मलिक यांना अटक केली आहे. आता या प्रकरणी सर्व पुरावा न्यायालयात मांडण्यात येणार आहेत.
दरम्यान, नवाब मलिकांची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं असून या प्रकरणी किमान सात दिवसांची कोठडी मिळावी अशी मागणी ईडीकडून करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
नवाब मलिकांच्या अटकेनंतर मुख्यमंत्री आणि शरद पवार यांची बैठक होणार आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीनं काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. ईडीच्या रडारवर डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी ईडीच्या रडारवर होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येऊ शकतात याची दबक्या आवाजात चर्चा सुरु होती. आज मनी लॉंड्रिंग प्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे.
दाऊदचा भाऊ इब्राहिम कासकरला ईडी कोठडी
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला शुक्रवारी सात दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या जवळील लोकांविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तपास सुरु आहे. याप्रकरणी ईडीने इक्बाल कासकरला अटक केली होती. शुक्रवारी इक्बाल कासकरला विशेष मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टात हजर केलं होतं. यावेळी कोर्टाने इक्बाल कासकरला सात दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.
संबंधित बातम्या:
- Nawab Malik: ईडीकडून अटकेनंतर नवाब मलिक मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देण्याची शक्यता
- Nawab Malik : भंगारवाला ते मंत्री, असा आहे नवाब मलिकांचा राजकीय प्रवास
- Nawab Malik Arrest : ईडी आणि भाजप एकच, आम्ही छत्रपतींचे मावळे झुकणार नाही; नवाब मलिक यांच्या अटकेवर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया