मुंबई : अमित शाह यांनी शिवसेनावर सडकून टीका केली. जवळपास 25 वर्षांसाठी निवडणुकीच्या रिंगणात एकत्र राजकीय खेळी खेळणाऱ्या भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये आता मात्र सारंकाही आलबेल नाही.


राजकीय समीकरणं बिघडलेली असतानाच या दोन्ही पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरु झालं. त्याच पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी रविवारी शिवसेनेवर तोफ डागली. भाजप शिवसेनेच्या वाटेवर चालली असती तर शिवसेना महाराष्ट्रात उरलीच नसती, असा घणाघात अमित शाहंनी केला. ज्यानंतर राजकीय वर्तुळात अनेकांच्याच भुवया उंचावल्या. थेट शिवसेनेच्या अस्तित्वाबाबत दावा करणाऱ्या शाहंना अखेर शिवसेनेकडून सडेतोड उत्तर देण्यात आलं आहे.


शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत शिवसेना संपुष्टात आली असती म्हणणाऱ्यांना कशा प्रकारे या पक्षानं वास्तविकतेचा चेहरा दाखवला याचं प्रमाण दिलं. '1975 मध्ये रजनी पटेल आणि 90 मध्ये (बहुतेक मुरली देवरा यांनी) अशाच आशयाचं वक्तव्य केलं होतं की शिवसेना संपली. पुन्हा 2012 मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनीही असंच काहीसं म्हटलं. पण, या दोन्हीही प्रसंगी शिवसेना आधीपेक्षा जास्त ताकदीनं उभी राहिली', असं राऊतांनी ट्विट करत शाहंच्या वक्तव्याला प्रत्युत्तर केलं. जय महाराष्ट्र! लिहित त्यांनी आपल्या उत्तराला अधिक जोर दिला.





अमित शाह काय म्हणाले होते?


'भाजप शिवसेनेच्या वाटेवर चालली असती तर शिवसेना महाराष्ट्रात उरलीच नसती. महाराष्ट्रात तीन चाकी ऑटोरिक्षाचं सरकार तयार झाल्याचं ते म्हणाले. तीन चाकी सरकारची चाकं तीन दिशेला आहेत', असं म्हणत शिवसेना आणि महाविकासआघाडीवर शाहंनी निशाणा साधला.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे शिवसेनेनं प्रचार केला. राज्यातील सरकार हे जनादेशाचा अनादर करुन स्थापन झालेलं सरकार आहे, असं म्हणत बाळासाहेब ठाकरेंच्या सर्व सिद्धांतांना तापी नदीत सोडत हे राजकारण झाल्याची बाब त्यांनी यावेळी मांडली.