सातारा : पुणे-बंगळुरू महामार्गावरील सातारा जिल्ह्याच्या हद्दीतील वहागाव या ठिकाणी भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल चार युवकांना जीव गमवावा लागला आहे. हे सर्वजण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ या भागातील असल्याचं समोर आलेले आहे. अपघातग्रस्त वाहन स्विफ्ट गाडी असून या गाडीमध्ये एकूण पाचजण सिंधुदुर्ग ते मुंबई असा प्रवास करत होते. ही स्विफ्ट गाडी कराड सोडून पुढे आल्यानंतर तळबीड पोलिस ठाण्याच्या हद्दीत आल्यावर ती कठडा ओलांडून विरूद्ध दिशेला गेली आणि कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांवर आदळली.


या अपघातात निलेश मोडकर, मनोज परब, अंकुश शिंदे, भरत बोडकर या चौघांचा जागीचा मृत्यू झाला तर रोशन वरद हा थोडक्यात वाचला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त कार ही मुंबईच्या दिशेने जात असताना तिचा वेग हा जवळपास 160 असल्याचे स्पीडोमीटरच्या फोटो वरून दिसत आहे. ज्या वेळेला हा अपघात झाला त्या वेळेला स्पीडोमीटरही बंद पडले. या स्पीडोमीटरची नोंद पोलिसांनी आपल्या तपासादरम्यान करून घेतलेली आहे.


वहागावच्या वळणावरून जाताना गाडीचा वेग जास्त असल्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी रस्ता सोडून विरूद्ध दिशेतून कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांवर आदळली. या वाहनाचे स्पीड 160 असल्यामुळे वाहन चालकाला आपल्या गाडीवरील ताबा मिळवता आला नाही असे पोलिसांचे म्हणणे आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी तळबीड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी हजर झाले आणि जखमीना गाडीतून बाहेर काढले. हा अपघात एवढा भीषण होता की या मृत झालेल्या चौघांच्या शरीराचे छिन्न विछिन्न तुकडे झाले होते. अपघाताचे दृश्य पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहत होता. जखमीला कराड शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर उर्वरित चौघांचे शवविच्छेदन करण्यासाठी शवागृहात नेण्यात आले आहे. आज रविवार असल्यामुळे महामार्गावर प्रचंड मोठ्या वाहनांच्या रांगा होत्या. त्यात हा अपघात झाल्यामुळे काही काळ परिसरातील वाहतूक पूर्णपणे खोळंबली होती.