मुंबई : विरोधकांपाठोपाठ आता शिवसेनाही शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणार आहे. विरोधकांच्या संघर्षयात्रेनंतर शिवसेना एकदिवसीय मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहे.


या दौऱ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह शिवसेनेचे सर्व आमदार आणि मंत्री उपस्थित असतील.

शिवसेना 7 मे रोजी मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाईल. तूर खरेदी, गारपीट या मुद्द्यांवर औरंगाबादमध्ये एकदिवसीय दौऱ्यात सर्व आमदारांकडून परिस्थितीचा आढावा घेतला जाईल.

विरोधकांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्यभर संघर्षयात्रा काढली. त्यानंतर भाजपनेही संवादयात्रेची घोषणा केली. आता शिवसेना मराठवाडा दौऱ्यात शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून घेणार आहे.

''मन की नव्हे, आता गन की बात पाहिजे''

मन की नव्हे आता गन की बात पाहिजे, अशा शब्दात पाकिस्तानच्या हल्ल्याबाबत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.

मुंबईत तीन दिवस शिवसेनेने आमदार, नगरसेवक आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका बोलावल्या आहेत. याप्रसंगी झालेल्या भाषणात उद्धव ठाकरे बोलत होते.