Nilam Gorhe : केतकी चितळे हिच्या रूपाने राज्यात मिनी कंगना रनौत जन्माला येत आहे, अशी टीका विधान परिषदेच्या (Vidhan Parishad) उपसभापती नीलम गोर्हे (Nilam Gorhe)  यांनी केतकीवर केली आहे. जितेंद्र आव्हाडांच्या प्रकरणात अभिनेत्री केतकी चितळेने उडी घेतली होती. जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी केतकी केली आहे.


महिलेचा विनयभंग प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी (Mumbra Police) आव्हाड यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 354 नुसार गुन्हा दाखल केला. विनयभंग झाला आहे का नाही याचा निर्णय कोर्ट देईल. मात्र जे समोर आले त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न जितेंद्र आव्हाड करत आहेत असं व्हिडिओ मध्ये दिसत आहे, असं निलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. 


वैराची भावना राजकीय नेत्यांच्या मनात येऊ नयेत. त्यांनी संतापून किंवा दुःखी होऊन राजीनामा देऊ नये. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालावं. राजकारणात एकमेकांच्या विरोधात हीन पातळीवर वाभाडे काढणं सध्या सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी मध्यावधी निवडणुका लागतील असं बोलले तर त्यांच्यावर काही लोकांनी टीका केली, असं निलम गोर्हे म्हणाल्या.


बाल दिनानिमित्त मुंबईत एका शाळेत कार्यक्रम ठरला होता तिथे मुख्यमंत्री उशिरा पोहचले. शाळेचे विद्यार्थी म्हणजे गुवाहाटीला नेलेले आमदार नाही हे मुख्यमंत्री यांनी लक्षात घ्यायला हवं, असा हल्लाबोल निलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे. आम्ही 50 खोक्यावरुन  बोललो तर एवढं का वाईट वाटतं?  असा प्रश्न देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. 


विनयभंगाचा गुन्हा का दाखल केला?
रविवारी कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या तिसऱ्या कळवा खाडी पुलाचे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह पीडित महिला आणि अन्य नेते उपस्थित होते. संध्याकाळी नवीन उड्डाणपुलाच्या उद्घाटन समारंभात ही घटना घडल्याचा दावा एका 40 वर्षीय महिला सामाजिक कार्यकर्त्याने केला आहे. या महिलेचा दावा आहे की, आव्हाड यांनी महिलेला चुकीच्या पद्धतीने शरीराला स्पर्श करत तिला बाजूला होण्यास सांगितले. त्यानंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. त्यांनी राजीनामा देतो, असंही सांगितलं होतं. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेस त्यांच्या पाठीशी खंबीर उभी असल्याचं दिसलं. जयंत पाटील, अजित पवार, सुप्रिया सुळे या नेत्यांनी त्यांना राजीनामा न देण्याची विनंती केली आहे.