Nashik Crime News : नाशिक जिल्ह्यातील सटाणा शहरापासून जवळ असलेल्या पिंपळकोठे शिवारात खुनाची घटना समोर आली आहे. जमिनीच्या वादातून पुतण्याने काकाचा काटा काढल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण असून गुंगारा देऊ पाहणाऱ्या पुतण्याला जायखेडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. परंतु, नाशिकच्या ग्रामीण भागातील वाढती गुन्हेगारी पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे. 


सटाणा तालुक्यातील पिंपळकोठे येथील रहिवासी रमेश भामरे यांचा मृत्यू झाल्याची जायखेडा पोलिसात नोंद झालेली होती. मात्र हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यानुसार तपास सुरु असताना पोलिसांनी भामरे यांच्या अंत्यसंस्काराला साध्या वेशात उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी परिस्थितीची पाहणी करून शिक्षक भामरे यांचा पुतण्या सुजित भामरे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर सुजितला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने खून केल्याची कबुली दिली.  भामरे यांचा अपघात घडवून आणल्यानंतर त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले. याचा संशय पोलिसांना आल्याने या प्रकरणाला वाचा फुटली. 


मयत रमेश भामरे हे प्राथमिक शिक्षक होते. शाळा घरापासून जवळ असल्याने ते रोज ये जा करत असत. त्यांच्या कुटुंबीयांमध्ये जमिनीवरून वाद सुरु होते. अशातच भामरे हे नेहमीप्रमाणे घरी निघाले असता ट्रॅक्टरने कट मारल्याने अपघात झाला. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला, असा बनाव रचण्यात आला.  


नाशिकच्या ग्रामीण पोलिसांच्या जायखेडा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. मात्र शरीरावर जखमा असल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत असताना भामरे यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थिती लावली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी नजर ठेवून नातेवाइकांच्या हालचाली टिपल्या. यानुसार त्यांनी पुतण्या सुजित भामरे याला अटक केली. 


असा झाला खुनाचा उलगडा 
 घटना घडल्यानंतर चौकशीत मयत रमेश भामरे यांचा पुतण्या सुजित सुनील भामरे याने रमेश यांच्या दुचाकीला ट्रॅक्टरने धडक दिल्याचे समोर आले. जखमी झाल्यानंतर त्यांच्या डोक्यावरून हत्यारांने वार करून त्यांचा खून केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. अंत्यसंस्कारादरम्यान जायखेडा पोलिस साध्या गणवेशात उपस्थित होते. त्यात काका आणि पुतण्या यांच्यामध्ये जमिनीवरुन वाद असल्याचे समजले. काका रमेश भामरे यांना पुतण्या सुजीत भामरे याने ट्रॅक्टरने धडक दिली होती. त्यानंतरच्या फोन कॉलचा तपशील पोलिसांनी तपासला. त्याचबरोबर शेतात अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रॅक्टर देखील मिळून आला. या संपूर्ण प्रकरणानंतर तालुका हादरला असून परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.