मुंबई : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत ईव्हीएममध्ये झालेल्या बिघाडांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. निवडणूक आयोग म्हणजे तवायफ असल्याचं राऊत म्हणाले.


महाराष्ट्रातील पालघर आणि गोंदिया-भंडारासह देशातील चार लोकसभा मतदारसंघांतील जागांसाठी सोमवारी पोटनिवडणूक झाली होती. पालघर, गोंदिया-भंडारा आणि उत्तर प्रदेशातील कैरानामध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (ईव्हीएम) आणि व्होटर वेरिफाएबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) मध्ये बिघाड झाल्याचं पाहायला मिळालं.

उष्णतेच्या लाटेमुळे ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याचं निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
भंडारा- गोंदिया फेरमतदान: आजही मतदान यंत्रात बिघाड

'पालघर पोटनिवडणुकीच्या वेळी मतदारांना पैशाचं वाटप करताना आमच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना रंगेहाथ पकडलं होतं, मात्र निवडणूक आयोगाने कोणतीही कारवाई केली नाही. जर देशभरात निवडणूक आयोग अशीच निष्क्रियता दाखवत असेल, तर याचा अर्थ निवडणूक आयोग राजकीय पक्षांच्या तवायफसारखी वागत आहे.' असं खासदार संजय राऊत 'एएनआय'शी बोलताना म्हणाले.

'नागरिकांचा मतदार पद्धतीवरचा विश्वास उडत चालला आहे' अशी पुष्टीही राऊत यांनी जोडली.

खासदार नाना पटोले यांनी राजीनामा देत भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भंडारा-गोंदिया, तर भाजप खासदार श्रीनिवास वनगा यांच्या निधनानंतर पालघर मतदारसंघासाठी पोटनिवडणूक घेण्यात आली.

28 मे रोजी भंडारा-गोंदियासाठी मतदान झालं, तेव्हा अनेक ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये बिघाड होत असल्याचं लक्षात आलं. तसंच काही ठिकाणी मतदान उशीरा सुरु झालं. ज्यामुळे सगळी प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात अडकली होती. त्याची तक्रारही काँग्रेसनं थेट निवडणूक आयोगाकडे केली आहे.

दरम्यान मतदानावेळी झालेल्या घोळामुळे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळेंची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्याजागी कादंबरी बलकवडेंची नेमणूक कऱण्यात आली आहे.

उद्या, म्हणजे 31 मे रोजी सर्व लोकसभा पोटनिवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे.

संबंधित बातम्या 


गोंदिया-भंडाऱ्यात 49 ठिकाणी फेरमतदान 

पालघरमध्ये खासगी वाहनातून ईव्हीएमची वाहतूक


भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 42 टक्के मतदान


पालघर पोटनिवडणूक : सात उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंदिस्त