जळगाव : आयुर्वेद महाविद्यालयात शिकणाऱ्या 20 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पूजा अरुण पाटील असं या विद्यार्थिनीचं नाव आहे.


भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील चैतन्य आयुर्वेद महाविद्यालयात मंगळवारी संध्याकाळी ही घटना उघडकीस आली. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

या विद्यार्थिनीने आत्महत्या का केली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र नैराश्यातून तिने हे पाऊल उचलल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

पूजा मूळची जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पहुरगावची रहिवासी होती.तिचे वडीलही आयुर्वेदिक डॉकटर आहेत. त्यामुळे वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत, पूजानेही भुसावळ येथील चैतन्य आयुर्वेद महाविद्यालयात प्रथम वर्षात प्रवेश घेतला होता.

कॉलेजला उन्हाळी सुट्ट्या असल्याने पूजा आठवडाभर घरी जाऊन सोमवारीच वसतिगृहात परतली होती. ती पहाटेपासून आपल्या खोलीत अभ्यास करत बसली होती. त्यामुळे मैत्रिणींनीही तिला व्यत्यय आणला नव्हता.

सर्व विद्यार्थी लायब्ररीमध्ये अभ्यास करत होते. एरव्ही पूजाही तिकडेच अभ्यासाला जात होती. मात्र काल ती लायब्ररीत न आल्याने मैत्रिणींनी विचारपूस केली.

पूजाच्या खोलीच्या समोरच्या खोलीत राहणाऱ्या विद्यार्थिनीने संध्याकाळच्या सुमारास पूजाच्या खोलीचा दरवाजा उघडला. त्यावेळी पूजाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले.

सुसाईड नोट

दरम्यान, पोलिसांना पूजाच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट मिळाली आहे. पोलिसांनी या चिठ्ठीतील तपशील जाहीर केलेला नाही. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, नैराश्यातून पूजाने हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे.