पंढरपूर : राफेल घोटाळ्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देण्यास नकार दिला हे योग्यच केले असून बोफोर्सप्रमाणे राफेलचा निर्णय देखील जनतेच्याच न्यायालयात होईल अशी  टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. राफेल घोटाळ्याबाबत राहुल गांधी यांनी तीन राज्यांच्या निवडणुकीत जे वादळ उभे केले होते. यात भाजपचा सपाटून पराभव झाला असून यास राफेलचा मुद्दाही तेवढाच महत्वाचा ठरल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.


तीन राज्याच्या विजयानंतरही राहुल गांधी यांनी EVM मशीनवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.  जगभर या मशीन हद्दपार केल्या असताना आणि भाजप सोडून सर्वच पक्ष याला विरोध करत असताना याचा वापर करायचा का? याचा विचार करून निवडणूक आयोगाने निर्णय करावा, असे राऊत यांनी सांगितले.

विजय मल्ल्याबाबत गडकरी यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार राऊत यांनी घेतला.  नितीन गडकरी हे आजारी असल्याने त्यांना मल्ल्याच्या कर्जाचे आकडे ठाऊक नसतील. त्यामुळे त्यांनी मल्ल्याला क्लीनचिट दिली असेल, असा टोला राऊत यांनी लगावला.

ज्या पद्धतीने राफेलचा निर्णय देण्यात सर्वोच्य न्यायालयाने असमर्थता दाखवली. त्याच पद्धतीने राम मंदिराच्या बाबतीत न्यायालय निर्णय घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कायदे करणारे सभागृह आहे आणि त्याची फक्त अमंलबजावणी करण्याचे काम न्यायालयाचे असताना प्रत्येक गोष्टीत न्यायालय का टांग अडवतंय? असा सवालही राऊत यांनी केला.

राहुल गांधी यांनी हिंदू कार्ड वापरायला सुरुवात केली आहे. ते मंदिरे फिरले त्यामुळे तीन राज्याच्या निवडणुकीत भाजपचा मोठा मतदार काँग्रेसकडे वळला. आम्ही राहुल गांधी यांना अयोध्येत येऊन राम लल्लाचे दर्शन करण्याचे आवाहन केल्याचे राऊत यांनी सांगितले. अयोध्येसाठी पंढरपूर येथून उद्धव ठाकरे 24 डिसेंबरला रणशिंग फुंकणार असून पंढरपूर हे कोट्यवधी गोर गरीब मजूर शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे आराध्य दैवत असल्याने पंढरपूरची निवड केल्याचे राऊत यांनी सांगितले.