परभणी : माध्यमांकडे कुठलीही भूमिका न मांडता राष्ट्रवादीकडून गळचेपी होत असल्याचा आरोप करत थेट मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा पाठवणारे शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी आज आपले मौन सोडले आहे. त्यांनी एबीपी माझाशी खास बातचीत केली आहे. ज्यात त्यांनी राष्ट्रवादीसह आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यावर देखील त्यांनी आरोप केले आहेत. शिवाय मी शिवसेनेतच आहे शिवसेनेतच राहणार असल्याचे देखील स्पष्ट केले आहे. याशिवाय जिल्ह्याचे प्रश्न सुटत नसतील तर मी जरी पक्षाचा असलो तरी मला लोकांसाठी लढा उभारावा लागेल. त्यामुळे उद्यापासून परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील 70:30  च्या आरक्षणाविरोधात लढा उभारणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचा शिवसेना खासदार संजय जाधव यांच्यावर आरोप


एबीपी माझाशी बोलताना ते म्हणाले की, बाजार समित्या असतील किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्था या सर्वच ठिकाणी सर्वांना सामान वाटा मिळायला हवा. मात्र असं काही होत नाही. याच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आमच्या गंगाखेड येथील विधानसभा प्रमुखांना फूस लावली आणि रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांना सोबत घेऊन गंगाखेड मधील बाजार समितीतही आपले प्रशासक आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आपण ही बाब राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कानावर घातली. तेव्हा त्यांनी यात मुदतवाढ दिली नाही. त्यामुळे स्थानिक नेत्यांनी सर्वांना सोबत घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तथा उपमुख्यमंत्री अजित पवार अडचणीत येतील असं काही करू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.


परभणीतील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक, काचा फुटल्या


जाधव यावेळी म्हणाले की, परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावं, यासाठी आम्ही लढा उभारला. मंजूर करून घेतले, मात्र आता त्यात काहीही होत नसल्याने जनभावना लक्षात घेऊन मी पक्षाचा खासदार असलो तरी मला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील 70:30 चे आरक्षण रद्द करण्यासाठी उद्यापासून आंदोलन उभारावं लागत आहे. मराठवाड्यातील सर्व खासदार, आमदारांनी येत्या अधिवेशनात हा विषय मांडून उद्या सर्वच जिल्ह्यात हे आंदोलन करावे, असं आवाहन जाधव यांनी यावेळी मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींना केले आहे.


शिवसेना खासदार संजय जाधव यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ का आली?


परभणी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला


राज्यातील महाविकास आघाडीत सर्व काही व्यवस्थित सुरू असल्याचे जरी वरिष्ठ नेते सांगत असले तरी स्थानिक पातळीवर मात्र चित्र वेगळं आहे. परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राजीनामा पाठवल्यानं हे उघड झालंय. परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. इथे खासदार आणि आमदार हा शिवसेनेचा असतो, मात्र स्थानिक स्वराज्य संस्था ह्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे असतात हे आजपर्यंतचे सूत्रच आहे. त्यामुळे इथे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे प्राबल्य स्थानिक पातळीवर अधिक आहे. आता तर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने या तिन्ही पक्षांची ताकत वाढली असली तरी नेत्यांमधील धुसफूस आणि विरोध आजही कायम असल्याचे खासदार संजय जाधव यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिल्यानंतर स्पष्ट झालंय.