सोलापूर/पंढरपूर : मंदिरं खुली करण्यासाठी आज विश्व वारकरी सेवा आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आज पंढरपुरात आंदोलन करणार आहे. कार्यकर्त्यांनी आज सकाळी सोलापुरातील विठ्ठल मंदिर उघडलं. तर आंदोलनासाठी प्रकाश आंबेडकर सोलापूरहून पंढरपूरला रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत चार गाड्यांचा ताफा असून त्यात कार्यकर्ते आहेत. आंदोलनाच्या सुरुवातीला चंद्रभागा स्नान होईल, त्यांनंतर पुंडलिक दर्शन करुन प्रकाश आंबेडकर हे विठ्ठल मंदिरात प्रवेश करतील. या आंदोलनला 200 पेक्षा जास्त संघटनाचा पाठिंबा असल्याची माहिती देखील वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी दिली.
नाकाबंदीमुळे मोजकेच कार्यकर्ते पंढरपुरात
पोलिसांच्या नाकाबंदीमुळे वारकरी आणि वंचित बहुजन आघाडीचे मोजकेच कार्यकर्ते पंढरपूरमध्ये दाखल झाल्याने एक लाख वारकऱ्यांची घोषणा हवेतच विरणार आहे. प्रकाश आंबेडकर काल काहीवेळ माळीनगर इथे थांबून सोलापूरला मुक्कामाला गेले होते. अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी काल त्यांच्यासोबत चर्चा केली होती.
मोजक्या कार्यकर्त्यांसह नामदेव पायरीजवळ भजन करण्याची परवानगी द्यावी किंवा मोजक्या वारकऱ्यांसह मंदिरात सोडण्याची मागणी केली होती. आता यावर मुख्यमंत्री पातळीवर विचार सुरु आहे. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांना मोजक्या वारकऱ्यांसह विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळण्याची शक्यता आहे
पाच महिन्यांपासून मंदिरांसह धार्मिक स्थळे बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच महिन्यांपासून राज्यातील मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे बंद आहेत. मात्र भजन-कीर्तनासाठी मंदिर सुरु करण्यात यावे अशी मागणी वारकरी संघटनांमार्फत करण्यात आली होती. याच मागणीला पुढे नेत विठ्ठल मंदिर सुरु करण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरी यांनी केली. त्यासाठी 31 ऑगस्ट रोजी पंढरपुरात 1 लाख वारकऱ्यांचा उपस्थितीत आंदोलन करण्याचा इशारा दिला. शासनातर्फे अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आज पंढरपुरात प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात मंदिर खुले करण्यासाठी आंदोलन होणार आहे.
वंचितची याधीची आंदोलनं!
याआधी 12 ऑगस्ट रोजी आंबेडकरांनी राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु करण्यासाठी 'डफली बजाओ' आंदोलन केलं होतं. या आंदोलनात नागपूरच्या मध्यवर्ती बस स्थानक चौकात आंबेडकरांनी स्वत: डफली वाजवत आंदोलनात सहभाग नोंदवला. तर लॉकडाऊनमुळे अनेकांची उपासमार होत आहे असे म्हणत नाभिक समाज आणि इतर श्रमिकांच्या मागण्यांसाठी देखील वंचिततर्फे ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. लॉकडाऊनच्या कालावधीत भरमसाठ वीजबिले पाठवण्यात आली आहेत, ही बिले सरसकट माफ करण्यात यावी यासाठी देखील वंचिततर्फे आंदोलन करण्यात आले आहे.