कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आमदारकीचा राजीनामा देणारे हर्षवर्धन जाधव हे आता स्वतः राजकीय पक्ष काढण्याच्या तयारीत आहेत. आरक्षणावरून समाजात बिघडत चाललेल्या परिस्थितीला रुळावर आणण्यासाठी एका नवीन राजकीय पक्षाची स्थापना करणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिली.
हर्षवर्धन जाधव कोल्हापुरात बोलत होते. येत्या 27 ऑगस्टला या राजकीय पक्षासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुंबईला राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीनंतर लगेचच राजकीय पक्षाची घोषणा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांनी यापूर्वीही अनेकदा स्वतंत्र पक्ष काढण्याचे संकेत दिले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा दिल्यापासून त्यांचा राज्यभरात विविध ठिकाणी दौरा सुरु आहे. अखेर आपण स्वतंत्र पक्ष काढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.
कोण आहेत हर्षवर्धन जाधव?
हर्षवर्धन जाधव हे शिवसेनेचे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड मतदारसंघाचे आमदार आहेत. विविध वक्तव्यांमुळे ते नेहमी चर्चेत असतात. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण औरंगाबाद दौऱ्यावर असताना हर्षवर्धन जाधव यांनी पोलिसांशी हुज्जत घातली होती. पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवाय पोलिसांनीही हर्षवर्धन जाधव यांना मारहाण केली होती.
हर्षवर्धन जाधव यांनी राजकीय कारकीर्दीची सुरुवात मनसेतून केली. ते मनसेचे आमदार होते. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि कन्नडमधून निवडणूक लढवत विजय मिळवला.
आतापर्यंत चार वेळा राजीनामा
हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला आहे. मात्र तो राजीनामा अजून विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारलेला नाही. त्यांनी राजीनामा देण्याची ही पहिलीच वेळ नाही. विविध कारणांवरुन हर्षवर्धन जाधव यांनी आतापर्यंत चार वेळा राजीनामा दिलेला आहे. मात्र एकदाही तो स्वीकारण्यात आला नाही.
हर्षवर्धन जाधव औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार असले तरी त्यांचं जिल्ह्यातील शिवसेनेच्या एकाही नेत्याशी पटत नाही. खासदार चंद्रकांत खैरेंवर निशाणा साधल्यामुळे ते नेहमी चर्चेत असतात.
विशेष म्हणजे हर्षवर्धन जाधव हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपात येण्यासाठी आपल्याला पाच कोटींची ऑफर दिली, असा खळबळजनक गौप्यस्फोटही हर्षवर्धन जाधव यांनी केला होता.
हर्षवर्धन जाधव नवा पक्ष काढण्याच्या तयारीत, लवकरच घोषणा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Aug 2018 08:34 PM (IST)
आरक्षणावरून समाजात बिघडत चाललेल्या परिस्थितीला रुळावर आणण्यासाठी एका नवीन राजकीय पक्षाची स्थापना करणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -