जळगाव : जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी पाठोपाठ शिवसेनेत देखील गटबाजी असल्याचं चव्हाट्यावर आलं आहे. ज्येष्ठ कार्यकर्ते असलेले आमदार चिमणराव पाटील यांनी मी पक्ष सोडून जावे यासाठी मला स्थानिक पातळीवरील नेते आणि कार्यकर्ते अपमानास्पद वागणूक देत आहेत, असा थेट आरोप एरंडोल-पारोळाचे आमदार यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांचं नाव न घेता केल्यानं राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते असलेले आमदार चिमणराव पाटील यांनी यासंदर्भात बोलताना सांगितलं की, "अलीकडेच पक्षात नुकतीच नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाली. यात पारोळा तालुक्यात नवीन जिल्हाप्रमुख देण्यात आला आहे. मात्र याबाबत मला साधे विचारात सुद्धा घेतले नाही, माझ्या तालुक्यातील नियुक्तीबाबत मला साधी माहिती देखील देण्यात आली नाही. ही बातमी मला वर्तमानपत्रात वाचल्यावर लक्षात आली. तसेच निधीच्या बाबतीतसुद्धा स्थानिक पातळीवर इतर आमदारांना जसा निधी दिला जातो, तसा आपल्याला दिला जात नाही.", असं म्हणत हेतुपुरस्कर आपल्याला डावलल जात असल्याचा आरोप करीत आमदार चिमणराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
माझा पक्षातील वरीष्ठ नेत्यांवर राग नाही आणि त्यांचा ही माझ्यावर राग नाही. परंतु स्थानिक पातळीवर नेते जाणीव पूर्वक त्रास देत असून आपल्याला ज्या पद्धतीने सन्मानाने वागणूक दिली जायला पाहीजे, आपल्याला विचारात घेतले पाहिजे, तसे न होता, अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचही आमदार चिमणराव पाटील यांनी म्हटलं आहे.
"आपल्याबाबत होत असलेल्या या प्रकाराची माहिती आपण पक्षाच्या वरीष्ठांना दिलेली आहे. त्यावर वरिष्ठ नेते योग्य ती दखल घेतील आणि कार्यवाही करतील, अशी आपल्याला अपेक्षा आहे. वरिष्ठ काय निर्णय घेतात त्याची आपण प्रतीक्षा करत आहोत. आपण कट्टर शिवसैनिक असून आपला कितीही त्रास झाला तरी आपण शिवसेना सोडणार नाही असा विश्वासही आमदार चिमणराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.
बॅनरवर फोटो नसल्याने जळगावात राष्ट्रवादीतील गटबाजी प्रदेशाध्यक्षांसमोर उघड
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील 'राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रे'निमित्त जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या उपस्थितीत जळगाव शहर आणि ग्रामीण मतदार संघाचा मेळावा घेण्यात आला होता. यावेळी जाहीर भाषणात उघडपणे फलकावरील फोटोवरुन माजी जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी माजी मंत्री गुलाबराव देवकरांबाबत नाराजी प्रकट केली होती. इतकेच नव्हे तर नेत्यांमधील मतभेद मिटवा, असे आवाहन केल्याने राष्ट्रवादीमधील गटबाजी प्रदेशाध्यक्षांसमोरच चव्हाट्यावर आली होती.