जळगाव : राजकारणात आपले वाढते वर्चस्व सहन होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्यापासून आपल्या विरोधात सतत कट कारस्थान रचले जात असून, आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. अस झालं तर त्याला खडसे परिवार जबाबदार असणार असल्याचा गंभीर आरोप मुक्ताईनगरचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. तर आपल्यापासून आमदार चंद्रकांत पाटील यांच्या जिवाला धोका आहे, असे म्हणणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केले आहे.
बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा रोष निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. याचं पार्श्वभूमीवर काल शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दोन कार्यकर्त्यांमध्ये मुक्ताईनगरमध्ये वाद निर्माण झाला होता. या वादानंतर दोन्ही कार्यकर्त्यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत एका स्थानिक वाहिनीच्या प्रतिनिधींशी फोनवर बोलताना रोहिणी खडसे यांनी आमदाराला चोप देणार असल्याची भूमिका घेतली असल्याचा आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला होता. आपण आमदार म्हणून निवडून आल्यापासून आपल्याला विविध प्रकरणी त्रास दिला जात आहे. आता तर थेट आमदाराला चोप देण्याची भाषा केली जात आहे. एखाद्या लोक प्रतिनिधीकडून अशी भाषा वापरली जात असेल तर ही गुंडगिरी नाही का? असा सवाल देखील आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.
एकनाथ खडसेंचा आपल्याविषयीचा रोष पाहता आणि त्यांची विधाने पाहता आपल्या जीवाला खडसे परिवारपासून घातपात होण्याचा धोका आहे. म्हणूनच आपण पोलीस अधीक्षक कार्यालयात अधीक्षकांची भेट घेण्यासाठी आलो होतो असे पाटील यांनी सांगितले. पोलिसांना आणि वरिष्ठ नेत्यांनाही याबाबत आपण कळवल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व प्रकाराला आपण घाबरत नसलो तरी आपल्या जीवाला धोका निर्माण झाल्यास त्याला खडसे परीवार जबाबदार असेल अशा प्रकारचा गंभीर आरोप चद्रकांत पाटील यांनी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडून दिली आहे.
आपल्यापासून आमदार चंद्रकांत पाटील यांच्या जिवाला धोका आहे, असे म्हणणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केले आहे. आपल्यावर अशा प्रकारचे कोणतेही गुन्हे आजपर्यंत दाखल झाले नाहीत. जे काही आहेत ते सर्व राजकीय गुन्हे आहेत. याउलट आमदार चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे मुक्ताईनगर तालुक्यात सट्टा, पत्ता, जुगार, अवैध रेतीसह आरटीओ अधिकाऱ्यांशी संगनमत करून नाक्यावर वसुली करण्यासारखे अवैध धंदे आहेत. मात्र, यांचे हे दोन नंबर धंदे बंद करण्यासाठी राष्ट्रवादीने चार दिवसपूर्वी पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन ते बंद करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनानुसार पोलिसांनी यांचे हे धंदे बंद करण्यासाठी कारवाईची मोहीम हाती घेतल्याने चंद्रकांत पाटील यांचा संताप होणे साहजिक आहे. या संतापामधूनच आपल्यावर आरोप केले जात असल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे.
चंद्रकांत पाटील यांचे हे धंदे बंद होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचे खडसे यांनी सांगितले. यावेळी आमदार पाटील यांच्या चालकाने एका महिलेशी फोनवर अश्लील संवाद साधल्याची ऑडिओ क्लिप माझ्याकडे आली होती. अजून दोन ऑडिओ क्लिप लवकरच येणार आहेत. त्या आल्यावर तुम्हाला त्या देण्यात येतील असेही खडसे यांनी यावेळी सांगितले. महिलांशी अश्लील संवाद साधणारा पाटील यांचाच पूर्वीचा ड्रायवर होता. त्याची क्लिप बाहेर येताच त्याला पाटील यांनी आता आरटीओ नाक्यावर वसुलीसाठी ठेवले आहे. त्यामुळे आमदार चंद्रकांत पाटील यांनी खरतर राजीनामा द्यायला हवा असेही खडसे यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या:
- सलमान खानला सर्पदंश! पनवेलमधील फार्महाऊसवरील घटना, संकट टळल्याची माहिती
- पंढरपुरात विठूरायाच्या दर्शनासाठी नवीन नियमावली, जाणून घ्या दर्शनाची वेळ