मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज ‘मातोश्री’ या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती समजते आहे.

दिवसभरात 'मातोश्री'वर नेमकं काय घडलं?

उद्धव ठाकरे यांनी बैठकीला उपस्थित आमदार, खासदार आणि मंत्र्यांकडून स्थानिक पातळीवरची सध्यस्थिती जाणून घेतली. स्थानिक पातळीवर भाजप प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचं मत सर्वांनी व्यक्त केलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी भाषणात निर्णय जाहिर केला.

उद्धव ठाकरेंची वाक्ये जशास तशी

- 50 वर्षाच्या कारकिर्दीत आपण सर्वांशी झुंज दिली. मग ते विरोधक काँग्रेस किंवा एनसीपी असोत, किंवा आपलेच नातेवाईक आणि सोडून गेलेले गद्दार असोत. आपण सगळ्यांना हरवलं. मात्र आता शेवटची लढाई आपल्या मित्राशी. याला जर आपण गाडलं तर आपण सर्वश्रेष्ठ ठरु.

- त्यामुळे आता कोणावर अवलंबून राहू नका, स्वबळावर लढण्याची तयारी करा...

- इतकी वर्षे मी दोन प्रकारचे शिवसैनिक पहिले. एक मर्द शिवसैनिक आणि एक घायाळ झालेला शिवसैनिक. मराठा मोर्चात दुर्दैवाने ओढवलेल्या वादामुळे मला शिवसैनिक घायाळ झालेले दिसले.

- आता ही उदासीनता झटका आणि पुन्हा उत्साहाने मराठा मोर्चात सामील व्हा.

- नविन पटनाईक (ओदिशाचे मुख्यमंत्री) यांना भाजपनं संपवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पटनाईकांनी भाजपला अंगावर घेतलं त्यामुळे त्यांचा पक्ष टिकला

- तामिळनाडूत जयललिता जेलमध्ये जाऊन आल्या, आणि आता आजारी असतानादेखील त्यांचा पक्ष एकजूट आहे. बिहारमध्ये लालूने एवढा भ्रष्टाचार करून सुद्धा जनतेने त्यांना पुन्हा निवडलं.

- तर आपण कुठे कमी आहोत, एकट्याने लढायची तयारी करा.