पंढरपूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज पंढरपूर दौऱ्यावर आहेत. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पंढरपूर भगवेमय झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. अयोध्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे यांचा हा महत्वाचा दौरा मानला जात आहे. पंढरपूरमध्ये उद्धव यांची सभाही होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे या सभेमध्ये काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे.


उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणाऱ्या आरतीसाठी शिवसेनेनं इस्कॉन घाट चकाचक केला असला तरी चंद्रभागेची दुरावस्था मात्र कायम आहे. उद्धव ठाकरे आज संध्याकाळी कुटुंबासह चंद्रभागेच्या पैलतीरावर असलेल्या इस्कॉन घाटावरून चंद्रभागेची महाआरती करणार आहेत.


त्यासाठी मठापर्यंत येणाऱ्या मार्गावर दुतर्फा शिवसेनेचे शेकडो झेंडे आणि बॅनर लावण्यात आली आहेत. याचबरोबर या मठापर्यंत येण्याचा रस्ता नव्यानं बनवून घेण्यात आला आहे. मात्र ज्याठिकाणी आरती होणार आहे, त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात मोकळ्या बाटल्या, निर्माल्य, जुने कपड्यांचा ढिगारा लागला आहे.


उद्धव ठाकरेच्या दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त


उद्धव ठाकरेंची महासभा आणि महाआरतीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त पंढरपूरात दाखल झाला आहे. नागरिकांनी कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये, असं आवाहन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.


दरम्यान यावेळी पहिल्यांदाच पोलिसांना QR कोडिंगची ओळखपत्रे देण्याचा प्रयोग जिल्हा पोलीस प्रशासनाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे बंदोबस्तामध्ये सुलभता येणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. स्वेरी इंजिनीअरिंग कॉलेजच्या मदतीने या ओळखपत्रांचे वाटप होणार आहे. QR कोडिंगची ओळखपत्रे असल्याने पोलिसांची ठिकाणे तातडीने अधिकाऱ्यांना समजू शकणार आहेत.


पाहा, कसा असेल उद्धव ठाकरेंचा पंढरपूर दौरा?