संभाजीनगर - लोकसभा निवडणुकांच्या उमेदवारी अर्ज भरण्यामुळे राजकीय नेत्यांची गडगंज संपत्ती सार्वजनिक होत आहे. विशेष म्हणजे अधिकृत असलेली ही संपत्तीही सर्वसामान्यांच्या भुवया उंचावणारी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीकडून कोणाला तिकीट मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. अखेर शिवसेना शिंदे गटाचे शिलेदार आणि मंत्री संदीपान भुमरेंना महायुतीकडून उमेदवार घोषित करण्यात आले. त्यानंतर, संदीपान भुमरेंनी शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या उमेदवारी अर्जात त्यांनी आपल्या संपत्ती जाहीर केली असून मंत्रीपदावर आल्यानंतर गेल्या 4 वर्षात त्यांच्या संपत्तीत अडीचपटीने वाढ झाल्याचं दिसून येत आहे.
राज्याचे रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांची संपत्ती मंत्रिपदाच्या काळात तब्बल अडीचपटीने वाढली आहे. त्यांच्याकडील मालमत्तेचे बाजारमूल्य 5.70 कोटींच्यावर आहे. तर, दुसरीकडे त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार माजी खासदार चंद्रकांत खैरे भुमरेंपेक्षा अधिक श्रीमंत आहेत. मात्र, खैरेंच्या संपत्तीत कोणतीही वाढ झाली नसून ती कमीच झाल्याच दिसून येत आहे. तसेच,खैरे यांनी स्वतःच्या नावे 1979 साली खरेदी केलेली 20 हजारांची फियाट कार तर पत्नीच्या नावे सफारी कार दाखवली असून तिची किंमत 50 हजार सांगितली आहे. तर, भुमरेंकडे 28 लाखांची फॉर्च्यूनर कार आहे. सोन्याच्या बाबतीत दोन्ही शिवसैनिक सारख्याच पातळीवर आहेत. खैरेंकडे 43 तोळे, तर भुमरेंकडे 45 तोळे सोने आहे. दरम्यान, 2019 साली संदीपान भुमरेंची संपत्ती 2 कोटी एवढी होती. गेल्या 4 वर्षांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांच्या संपत्तीत अडीच पटींनी वाढ झाली आहे.
दरम्यान, उमेदवारी अर्जाच्या निमित्ताने सर्वच उमेदवारांची संपत्ती जाहीर होत असून साताऱ्यातील राजघराण्याचे वारसदार छत्रपती उदयनराजे भोसलेंही संपत्ती जाहीर झाली असून ते अब्जाधीश आहेत. तर, कोल्हापूरच्या गादीचे वारसदार छत्रपती शाहू महाराज यांची संपत्तीही शेकडो कोटींची असून तब्बल 297 कोटी असल्याचे पत्रिज्ञापत्रातून समोर आले आहे. तर, राज्यातील विविध प्रमुख राजकीय पक्षांचे बहुतांश उमेदवार कोट्यधीश असल्याचंही या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. शिवसेना उबाठा पक्षाकडून चंद्रकांत खैरेंना उमेदवारी देण्यात आली असून शिवसेना शिंदे गटाकडून संदीपान भुमरे मैदानात आहेत. तर, विद्यमान खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तिजाय जलील हेही एमआयएमकडून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे, संभाजीनगरमध्ये यंदाही तिरंगी लढत आहे.
संदीपान भुमरेंची संपत्ती
2014 - 4 कोटी
2019 - 2 कोटी
2024 - 5.70 कोटी
चंद्रकांत खैरेंची संपत्ती
2014 - 1.47 कोटी
2019 - 9 कोटी
2024 - 8.83 कोटी