चंद्रपूर : कर्जानं दिलेले पैसे मागण्यासाठी गेलेल्या सावकारानं कर्जदाराच्या मुलाला आणि सुनेला पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची हृदयद्रावक घटना आज चंद्रपुरात घडली. यामध्ये मुलगा तीस टक्के तर पत्नी साठ टक्के भाजले आहेत. या दोघांवरही स्थानिक खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने शहर हादरले आहे.


चंद्रपूरच्या सरकारनगरात राहणारे हरिश्चंद्र हरिणखेडे हे व्यवसायाने शिक्षक आहेत. त्यांनी जसबीर भाटिया उर्फ सोनू याच्याकडून तीन लाख रुपयांचं व्याजी कर्ज घेतलं होतं. यातील दोन लाख रुपयांची परतफेड हरिणखेडे यांनी यापूर्वीच केली आहे. उर्वरित रकमेतील 60 हजार रुपये काल देण्याचं ठरलं होतं. ते घेण्यासाठी जसबीर भाटिया हरिणखेडे यांच्या घरी गेला होता.

यावेळी संपूर्ण कर्ज आजच परत करा असा आग्रह भाटिया याने केला होता. यावेळी जसबीर आणि हरिणखेडे कुटुंबीयात शाब्दिक खडाजंगी उडाली. तेव्हा जसबीरनं आपल्या गाडीच्या डिक्कीत ठेवलेल्या बाटलीमधून पेट्रोल काढून हरिश्चंद्र हरिणखेडे यांचा मुलगा पीयूष आणि सून कल्पना यांच्यावर शिंपडले आणि पेटवून दिले. या घटनेत पीयूष 30 टक्के तर कल्पना 60 टक्के भाजले आहेत.

या घटनेत जसबीरही किरकोळ भाजला. मात्र घटनेनंतर तो तिथून पळून गेला. यावेळी शेजारचे लोक धावून आले आणि त्यांनी या दोघांना वाचवलं. घरात लागलेली आगही विझवण्यात परिसरातील नागरिकांना यश आले.

हे सर्व प्रकरण कर्जानं घेतलेल्या पैशाच्या वादातून घडलं आहे. हरिणखेडे यांनी कर्जाचे अर्धेअधिक पैसे परत केले. पण तरीही जसबीरनं त्यांच्या कुटुंबीयांवर हा जीवघेणा हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, जसबीर भाटीया हा अवैधरीत्या सावकारी करतो. या घटनेत जखमी झालेल्या कल्पना आणि पीयूष हरिणखेडे यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पैसे देण्याचं कबूल केल्यानंतरही त्यानं हा जीवघेणा केल्यानं त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा हरिणखेडे कुटुंबानं व्यक्त केली आहे.

पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठत पंचनामा केला असून अवैध सावकारी करणाऱ्या सोनू भाटिया यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.