शिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं!
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 09 Aug 2018 08:23 PM (IST)
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मराठा आंदोलकाने खालच्या पातळीवर शिव्या दिल्या, असा आरोप करत संतप्त अंबादास दानवे यांनी मराठा आंदोलकाला अक्षरश: लाथडलं आहे.
औरंगाबाद : शिवसेनेचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी मराठा आंदोलकाला लाथ मारल्याचं समोर आलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आंदोलकाने शिवीगाळ केल्याने आपण त्याच्या अंगावर धावून गेल्याचे अंबादास दानवे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले आणि घडल्या प्रकाराचे दानवे यांनी समर्थनही केले. नेमकं काय झालं? मराठा समाजाकडून आज आरक्षणाच्या मागणीसाठी ‘महाराष्ट्र बंद’ची घोषणा करण्यात आली होती. त्याच निमित्ताने औरंगाबादच्या क्रांती चौकात ठिय्या आंदोलनाचं आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनस्थळी सकाळी 11 ते 11.30 वाजण्याच्या दरम्यान शिवसेनेचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख अंबादास दानवे आले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मराठा आंदोलकाने खालच्या पातळीवर शिव्या दिल्या, असा आरोप करत संतप्त अंबादास दानवे यांनी मराठा आंदोलकाला अक्षरश: लाथडलं. अंबादास दानवेंकडून घडल्या प्रकाराचं समर्थन या प्रकाराबद्दल एबीपी माझाने अंबादास दानवेंशी संपर्क साधला. त्यावेळी ते म्हणाले, “मी या प्रकाराचे समर्थन करतो. माझ्या नेत्याला कुणी खालच्या पातळीवर शिव्या देत असेल, तर मी ऐकून घेऊ शकत नाही. अन्यथा माझं त्या पदावर राहण्याला काहीच अर्थच उरणार नाही.” तसेच, आपण मराठा आंदोलकाच्या अंगावर धावून गेलो, मात्र लाथ मारली नाही, असेही ते म्हणाले. दरम्यान, अंबादास दानवे हे मराठा आंदोलकाला लाथ मारत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यामुळे जिल्हाप्रमुख पदावरील व्यक्तीने असे वर्तन करणे आणि घडल्या प्रकाराचे समर्थनही करणे, ही नक्कीच चिंतनीय बाब आहे. पाहा व्हिडीओ :