जालना : जालन्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तीन महिन्याचा चिमुकला आंदोलनात सहभागी झाला होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे खरंय. मराठा आंदोलक दाम्पत्याने आपल्या तीन महिन्यांच्या चिमुकल्याला सोबत घेऊन ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यामुळे सर्वांच्याच नजरा या चिमुकल्या आंदोलकाकडे वळल्या होत्या.


कपाळावर चंद्रकोरचा टिळा लावून बाबागाडीत सर्वांकडे टकमक पाहत असलेल्या अविरत अजिंक्य साधना जगताप या चिमुकल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

मराठा क्रांती आंदोलनात सहभागी झालेल्या या सर्वात कमी वयाच्या आंदोलकाचे नाव ‘क्रांती’ ठेवावे असा आग्रह इतर आंदोलकांकडून करण्यात आला. यावेळी त्या बाळाची आई साधना जगताप यांनी ही सर्वांच्या आग्रहाचे मान ठेवत आपल्या चिमुकल्याचे नाव आजपासून ‘अविरत क्रांती’ ठेवत असल्याचे जाहीर केले.

मराठा आरक्षणच्या मागणीसाठी जालन्यात आज दिवसभर ठिकठिकानी चक्का जाम आंदोलन झालं. जालना शहरातील अंबड चौफुली येथे महिलांनी ही मोठ्या संख्येने या आंदोलनालात सहभाग घेतला. यावेळी शेकडो महिलांनी आरक्षणाची मागणी करत भरपावसात रस्त्यावर ठिय्या मांडला.