मराठा आंदोलनादरम्यान संयम आणि शांतता बाळगा : नांगरे-पाटील
एबीपी माझा वेब टीम | 09 Aug 2018 05:10 PM (IST)
हिंसेचा निग्रहपूर्व त्याग करा. सामान्य माणसाला आंदोलनाचा त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याचं नम्र आवाहन विश्वास नांगरे पाटील यांनी केलं.
मुंबई : मराठा समाजाच्या आंदोलकांनी हिंसा टाळून संयम आणि शांततेच्या मार्गाचा अवलंब करावा, असं आवाहन विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी केलं. विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र बंद पुकारला होता. आंदोलनादरम्यान संयम आणि शांततेचा वापर करावा. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपले आदर्श आहेत. त्यांनी दिलेल्या विचारांचं पालन करा. हिंसेचा निग्रहपूर्व त्याग करा. सामान्य माणसाला आंदोलनाचा त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याचं नम्र आवाहन विश्वास नांगरे पाटील यांनी केलं. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर उर्से टोलनाक्याजवळ आंदोलन करण्यात आलं होतं. मात्र आंदोलकांशी संवाद साधून तेथील जमाव पांगवण्यात आला आणि हायवे सुरु करण्यात आला, अशी माहिती नांगरे-पाटलांनी दिली. रास्तारोकोच्या जवळपास 125 घटना समोर आल्या, मात्र एकाही ठिकाणी हिंसक वळण लागलं नाही. कुठेही दगडफेक किंवा सार्वजनिक संपत्तीचं नुकसान झालं नाही. अफवा पसरु नयेत, यासाठी बंद केलेलं इंटरनेट सुरु केल्याचंही विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितलं. गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा क्रांती मोर्चाने आज म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. या बंदमध्ये मुंबईचा समावेश असला, तरी नवी मुंबई आणि ठाण्यातील मराठा समाज सहभागी झालेला नाही. मराठा समाजाला आरक्षण द्यावं, आरक्षण जाहीर होईपर्यंत मेगा भरती स्थगित करावी, कोपर्डी बलात्कारातील आरोपींना फाशी द्यावी या प्रमुख मागण्यात मराठा आंदोलकांच्या आहेत. त्यापैकी मेगा भरती स्थगित करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 ऑगस्ट रोजी केली.