नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यातील बैठकीनंतर 9 जणांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं सुत्रांकडून समजतं आहे. पण या नऊ जणांमध्ये मित्रपक्षातील एकाही नेत्याचं नाव नसल्याचं आता समोर आलं आहे.
त्यामुळे शिवसेना आणि जेडीयूला या मंत्रिमंडळ विस्तारात काहीच मिळणार नसल्याचं समोर येत आहे. मित्रपक्षांच्या कोणत्याही नेत्याचा उद्या शपथविधी होणार नसल्याची माहिती सुत्रांकडून समजते आहे.
आतापर्यंत हाती आलेली नावं ही सर्व भाजपमधील आहेत. यामध्ये शिवसेना किंवा जेडीयूच्या एकाही नेत्याचं नाव नाही. त्यामुळे या दोन्ही मित्र पक्षांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.
मात्र, असं असलं तरी रात्रीतून काही घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नेमकं चित्रं उद्या सकाळीच स्पष्ट होईल.
वाजपेयींच्या काळात 16 खासदार असताना शिवसेनेला 3 मंत्रिपदं मिळाली होती. मात्र आत्ता लोकसभेत 18, राज्यसभेत 3 असे एकूण 21 खासदार असतानाही शिवसेनेची बोळवण अवघ्या एका मंत्रिपदावर झाली.
त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्तारात किमान दोन मंत्रिपदं मिळतील अशी शिवसेनेला आशा होती. मात्र, आतापर्यंत हाती आलेल्या नावांमध्ये शिवसेनेचा कुठेही उल्लेख नाही.
संबंधित बातम्या :
मंत्रिमंडळ विस्तारात 9 नव्या चेहऱ्यांना संधी : सूत्र
संरक्षणमंत्रिपदासाठी गडकरी, प्रभू आणि सुषमा स्वराज यांची नावं चर्चेत!