ठाणे : ठाणे महापालिकेवर 25 वर्षे सत्ता गाजविणाऱ्या शिवसेनेने महापालिका निवडणुकांचे उमेदवार निवडताना पुन्हा एकदा घराणेशाहीचा झेंडा फडकाविला असून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षाचे आमदार, खासदार, महापौर यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्यात आली आहे.
माजी महापौर हरिश्चंद्र पाटील यांच्यासह, त्यांची पत्नी कल्पना आणि सुन स्नेहा यांना उमेदवारी दिली आहे. विद्यमान महापौर संजय मोरे यांची पत्नी सुखदा यांच्या भावाला तिकीट देण्यात आले आहे. रवींद्र फाटक यांच्या भावाच्या पत्नीस उमेदवारी दिली आहे.
राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले घोडबंदर भागातील देवराम भोईर यांच्या कुटुंबाला चार जागा बहाल करण्यात आल्या असून स्वतः देवराम, मुलगा भुषण, संजय आणि सुन उषा यांचा यामध्ये समावेश आहे.
आमदार रवींद्र फाटक यांची पत्नी जयश्री आणि भावाची पत्नी नम्रता,आमदार प्रताप सरनाईक यांची पत्नी परिषा, मुलगा पुर्वेश, आमदार सुभाष भोईर यांचा मुलगा सुमित, खासदार राजन विचारे यांची पत्नी नंदीनी आणि पुतण्या मंदार, अनंत तरे यांचा भाऊ संजय आणि भावजय महेश्वरी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा भाऊ प्रकाश यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
शिवसेने उमेदवारी नाकारल्याने शिवसेना उपशहर प्रमुख विलास ढमाले यांनी अपक्ष उमेदवारी भरून टेंभी नाका येथील आनंद दिघे यांच्या पुतळ्याजवळ उपोषण सुरू केलं आहे.
ढमाले हे शिवसेनेचे सर्वात जुने आणि निष्ठावंत शिवसैनिक आहेत. त्यांचा आरोप आहे की ज्यांना तिकीट नको होते त्यांना बोलावून दिले, पण काम करणाऱ्या निष्ठावंताना डावलण्यात आलं.