भ्रष्टाचारात शिवसेनाच नाही, भाजपचाही सहभाग : शरद पवार
एबीपी माझा वेब टीम | 04 Feb 2017 09:21 PM (IST)
मुंबई : मुंबई महानगरपालिकेत भ्रष्टाचार झाला असेल तर त्यात भाजपचाही सहभाग आहे. कारण सत्तेत फक्त शिवसेना नाही तर त्यांच्यासोबत भाजपही मांडीला मांडी लावून बसलेली आहे, असं म्हणतं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना भाजपवर हल्लाबोल केला. मुंबईतील मानखुर्द येथून राष्ट्रवादीने महापालिकेच्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, सचिन अहिर यांची उपस्थित होती. ''सर्व गुंडांना पवित्र करण्याचं काम देवेंद्र"भाई" करत आहेत'' शरद पवारांनी भाजपातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नेत्यांच्या इनकमिंगवरुही भाजपला लक्ष्य केलं. सर्व गुंडांना पवित्र करण्याचं काम 'देवेंद्र'भाई करत आहेत, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. जनतेने मोदींवर विश्वास ठेवून सेत्तेच्या चाव्या त्यांच्या हातात दिल्या. मात्र काहीही परिवर्तन नाही. मुंबईतील कष्टकरी लोकांचं जीवन उध्वस्त झालं आहे. पण शिवसेना-भाजप एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात व्यस्त आहेत, असं म्हणत त्यांनी शिवसेना आणि भाजपचाही समाचार घेतला.