उस्मानाबाद : काँग्रेसने उस्मानाबादच्या येणगुरमध्ये महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या प्रचाराचा नारळ फोडला. मात्र सभेआधी एका कार्यकर्त्याच्या घरी काँग्रेस नेत्यांसाठी शाही जेवणाचा बेत आखण्यात आला होता. काँग्रेसने आपण सध्या विरोधी पक्षात आहोत, हे अजून स्विकारलेलच नाही का, असा सवाल या शाह जेवणानंतर केला जात आहे.
जेवणासाठी चक्क सोन्याचा मुलामा देण्यात आलेल्या ताट-वाट्या होत्या. याच सोनेरी ताट-वाट्यांमधून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, आमदार बसवराज पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे, शिवराज पाटील चाकुरकर यांनी जेवणाचा आस्वाद घेतला.
खास नांदेडमधल्या कॅटरर्सकडून ही सोन्याचा मुलामा असलेली भांडी मागवण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी दौऱ्यादरम्यान गरीब कार्यकर्त्यांच्या घरी जेवण करतात. त्यामुळे महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांचा हा सोन्याचा घास त्यांना कितपत आवडेल, हा प्रश्न काँग्रेस नेत्यांनी स्वतःलाच विचारायला हवा.
दरम्यान पृथ्वीराज चव्हाण काही दिवसांपूर्वी बीडमधील अंबाजोगाईला दुष्काळी दौऱ्यावर आले होते, तेव्हा त्यांच्यासाठीही एका कार्यकर्त्याने असाच बेत आखला होता. मात्र आपण दुष्काळी दौऱ्यावर आहोत, जनता दुष्काळात होरपळत आहे, असं सांगत त्यांनी ते शाही जेवण नाकारलं होतं.