मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह (Election Symbols) गोठवलंय आणि ठाकरे आणि शिंदे गटाला नवीन चिन्ह घ्यायचे निर्देश दिले आहेत. शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचं या वादात आता हे चिन्ह सध्यातरी कुणालाच मिळणार नसल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे या दोन्ही गटांना आता नवीन चिन्हासाठी पर्याय द्यावा लागणार आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाकडून त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल यापैकी एका चिन्हाची पर्यायी मागणी करण्यात आली आहे. तर शिंदे (Eknath Shinde) गटाने आपले पत्ते अद्याप खुले केले नाहीत. कोणत्याही नव्या चिन्हाच्या पर्यायासाठी निवडणूक आयोगाकडे एक यादी तयार असते, त्यामधून या चिन्हांची निवड करता येते. पण या यादीत अशी काही चिन्हं आहेत, जी कोणताही पक्ष घेण्याचं धाडस करणार नाही. त्यामध्ये फुगा, कचरापेटी, सूप, टायर, हंडा, भेंडी, चप्पल, बाबागाडी, टरबूज, ट्रे, तंबू या सारख्या विचित्र चिन्हांचा समावेश आहे. 


पक्षाचं चिन्ह हे पक्षाची ओळख असते. कमळ म्हटल्यावर भाजप समोर येतो, हात पाहिल्यावर काँग्रेस आठवते, घड्याळ म्हटल्यावर आपल्या मनात राष्ट्रवादीची टिकटिक सुरू होते, हत्ती म्हटल्यावर बसपा समोर येतो आणि धनुष्यबाण म्हटल्यावर शिवसेना. आता धनुष्यबाण हे चिन्ह सध्यापुरतं तरी गोठलं आहे म्हणा. पण अशी अनेक चिन्हं आहेत, जी पाहिल्यावर एखादा पक्ष आणि त्या पक्षाची प्रमुख व्यक्ती डोळ्यासमोर येते. त्यामुळे पक्षासाठी आणि त्याच्या निवडणुकीतील यशासाठी चिन्ह हे सर्वात महत्त्वाचं आहे. पण चिन्ह जर आपल्या पसंतीचं असेल तर ते पॉझिटिव्ह अॅंगलने ते लोकांपर्यंत पोहोचवता येतं, आणि त्या आधारे सत्ता मिळवता येते. 


चप्पल, दाढीचं खोरं अन् विटा... क्या कहेंगे लोग? 


निवडणूक आयोगाच्या या यादीत 197 चिन्हांचा समावेश आहे. यामध्ये अनेक चिन्हं ही मजेदार आहेत, जी कोणीही आपल्या पक्षासाठी घ्यायचं धाडस दाखवणार नाही हे नक्की. चप्पल किंवा कचरापेटी, टरबूज, पँट अन् पाण्याची टाकी जर चिन्ह असेल तर मग मात्र ते लोकांसमोर कसं घेऊन जायचं? चप्पल या चिन्हाच्या आधारे मत मागताना मतदारराजा काय उत्तर देणार? टरबूज चिन्हावर मतं मागताना मतदारांनेच मतपेटीतून उमेदवाराला टरबूज दिला तर? किंवा विटा हे चिन्ह लोकांपर्यंत नेताना काय अवस्था होईल? दाढी खोरं जर चिन्ह असेल तर त्या खोऱ्याने हाताच्या बोटावर मोजता येईल इतकं तरी मतदान ओढता येईल का? 


अशी चिन्हं जी कुणीही घेणार नाहीत 


निवडणूक आयोगाच्या यादीत अशी काही विचित्र चिन्हं आहेत, जी कुणीही घ्यायचं धाडस करणार नाही. ती खालीलप्रमाणे, 


बांगड्या, सायकलचा हवा भरायचा पंप, बेल्ट, डबल रोटी, विटा, ब्रश, रॉकेलचा कॅन, चप्पल, कानातले झुमके, लिफाफा, वीजेचा खांब, फणस, लूडो गेम, माईक, मिक्सर, नेल कटर, पॅन्ट, पेट्रोल पंप, फोन चार्जर, उशी, दाढीचं खोरं, बूट, पायातले मोजे, स्टॅपलर, स्टूल, इंजेक्शन, तंबू, चॉकलेट, ट्रे, पाकिट, टरबूज, पाण्याची टाकी, बाबागाडी, हिरवी मिरची, शिमला मिरची, कपाट, शिलाईचा दोरा, साबन ठेवायचा बॉक्स. 


या व्यतिरिक्त चिन्ह सूचवू शकता 


निवडणूक आयोगाच्या यादीतील उपलब्ध असलेल्या एका चिन्हाची आपण आपल्या पक्षासाठी निवड करु शकतो. पण यातील एकही चिन्ह पसंतीस आलं नाही तर? तर यावरही उपाय आहे. आपण या व्यतिरिक्त आपल्या आवडीची काही चिन्हं पर्याय म्हणून निवडणूक आयोगाला सूचवू शकतो. मग त्यापैकी एक चिन्ह, जे नियमात बसत असेल, ते चिन्ह आपल्याला मिळू शकतं. 


ठाकरे गटाने सूचवलेली चिन्हं 


शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर आता ठाकरे गटाकडून उगवता सूर्य, त्रिशूल आणि मशाल या तीन चिन्हांचा पर्याय देण्यात आला आहे. या तीन चिन्हांपैकी एक चिन्ह ठाकरे गटाला मिळू शकेल.