एकनाथ खडसे राजीनामा द्या : शिवसेना
एबीपी माझा वेब टीम | 02 Jun 2016 07:41 AM (IST)
मुंबई : विविध आरोपांच्या चक्रव्युहात सापडलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याभोवतीच्या अडचणीत आता आणखी वाढ होत आहे. कारण मित्रपक्ष आणि सत्तेतील सहकारी शिवसेनेनेही एकनाथ खडसेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. खडसेंनी त्यांच्यावर असलेल्या आरोपांची चौकशी होईपर्यंत पद सोडावं, निर्दोषत्व सिद्ध करुन सन्मानाने मंत्रिमंडळात यावं, ही महाराष्ट्राची परंपरा आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. खडसे यांच्याविरोधात लाचखोरी, जमीन लाटल्याच्या प्रकरणासह इतर गंभीर आरोप आहेत. अशावेळी पारदर्शक कारभाराचा हवाला देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी तातडीनं त्यांचा राजीनामा घ्यावा असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. थोड्याच वेळापूर्वी एबीपी माझाशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. दरम्यान, शिवसेनेच्या मागणीनंतर एकनाथ खडसे यांनी याप्रकरणी काहीही बोलण्यास नकार दिला आहे. मला काहीही बोलायचं नाही, पक्षाचे अध्यक्ष बोलतील, असं खडसे म्हणाले. दरम्यान, राजीनाम्यासाठी दबाव असल्यानं खडसेंनी मुंबईतून काढता पाय घेतला आहे. मुक्ताई अंतर्धान सोहळ्याच्या निमित्तानं खडसे गेल्या तीन दिवसांपासून मुक्ताईनगरात आहेत. विशेष म्हणजे या काळात त्यांनी सरकारी गाडीचा वापर करणंही टाळलं आहे. खडसेंवरील आरोप *कथित पीए गजानन पाटीलकडून खडसेंच्या नावे 30 कोटी लाच मागितल्याचा आरोप, गजानन पाटीलला अटक *जावयाची लिमोझिन कार बेकायदा असल्याचा आरोप *दाऊदच्या कॉलर लिस्टमध्ये खडसेंचा नंबर असल्याचा हॅकरचा दावा * भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी वाद भोसरी जमीन खरेदीप्रकरण भोवणार? भोसरीतील जमीन खरेदीप्रकरणी खडसे सध्या रडारवर आहेत. कारण भोसरी एमआयडीसीमधील सर्व्हे नंबर ५२ मधील तीन एकर जागेचा हा वाद आहे. ही जमीन गेल्या महिन्यात खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीष चौधरी यांनी अब्बास उकानी या व्यक्तीकडून, तीन कोटी 75 लाख रुपयांना खरेदी केली. पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात या व्यवहाराची नोंद करून स्टँप ड्युटी म्हणून एक कोटी 37 लाख रुपये देखील भरण्यात आले. परंतु ही जमीन एमआयडीसीच्या मालकीची असल्याचं उघड झालं आहे.