नागपूर: नोटबंदीच्या निर्णयानंतर रांगेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना उत्तर प्रदेश सरकारनं दोन लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारनं 10 लाख रुपये द्यावेत. अशी मागणी शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी केली आहे.
आमदार सुनील प्रभू यांनी यासंदर्भात विधानसभेत प्रश्न विचारला आहे. देशभरात नोटबंदीनंतर आतापर्यंत 60 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रात 10 हून अधिक जणांचा बळी गेला. त्यामुळे सरकार कुटुंबीयांना मदत करतं का हे पाहणं महत्वाचं आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला आज एक महिना पूर्ण झाला आहे. त्यामुळे आता नोटबंदीचे परिणाम आणि निर्णयाच्या यशा-अपयशाविषयी चर्चांना उधाण आलं आहे.
सुट्ट्या पैशांच्या तुटवड्यामुळे नागरिक सध्या बेजार झाले आहेत. एटीएममधूनही बहुतांश वेळा दोन हजार रुपयांची नोट येत असल्याने राज्यापासून देशभरात सर्वत्र सुट्ट्या पैशांचा तुटवडा निर्माण झाला आहे.
लोकांना त्यांचा पगार काढण्यासाठीही तासनतास रांगेत उभं राहावं लागत आहे. अनेक बँकांमध्ये रोकड कमी असल्याने सरकाने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षाही कमी रक्कम ग्राहकांच्या हातात पडत आहे.