दिल्ली : पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला केंद्रीय कॅबिनेटनं हिरवा कंदील दाखवला आहे. पुणे मेट्रोचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवण्यात आला होता. पंतप्रधान कार्यालयाच्या मंगळवारी मिळालेल्या मान्यतेनंतर आज हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रीमंडळापुढे ठेवण्यात आला. 31.254 किमीच्या या प्रकल्पात दोन वेगळे कॉरिडॉर असतील. यात पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट (11.57 किमी एलिव्हेटेड आणि 5.019 किमी भूमिगत) पहिला टप्पा असेल, तर वनाझ ते रामवाडी (14.665 किमी एलिव्हेटेड) असा दुसरा टप्पा असेल.


पुणे मेट्रोला केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत हिरवा कंदील दाखवण्यात आल्यानं गेली अनेक वर्ष रखडलेला प्रस्ताव मार्गी लागला आहे. मेट्रोला आतापर्यंत केंद्रीय अर्थ आणि नगरविकास मंत्रालय, सार्वजनिक गुंतवणूक मंडळ अर्थातच पीआयबीनं यापूर्वीच मान्यता दिली आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या मान्यतेनंतर केंद्रीय कॅबिनेटनंही आज पुणे मेट्रोला मान्यता दिली आहे. पुणे मेट्रोचा प्रस्तावित खर्च अंदाजे 11,420 कोटी इतका आहे. तसंच या प्रकल्पाचा फायदा पुण्यासह पिंपरी-चिंचवडच्या 50 लाख लोकांना होणार आहे.

केंद्रीय कॅबिनेटच्या मान्यतेनंतर 24 डिसेंबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रोच्या भूमिपूजनाचा मुहूर्तही शोधण्यात आला आहे. पुणे मेट्रो प्रकल्प पाच वर्षात पूर्ण करण्याचं नियोजनही करण्यात आलं आहे.