मुंबई : विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेनेने आपला तिसरा उमेदवारही घोषित केला आहे. हिंगोली-परभणी येथून विधानपरिषदेसाठी विपुल बजोरिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
विपुल बजोरिया हे शिवसेनेचे अकोला-बुलडाणा विधानपरिषदेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बजोरिया यांचे चिरंजीव आहेत.
शिवसेनेचं संख्याबळ जास्त असून आमचा उमेदवार जिंकेल, स्वबळावर निवडणूक जिंकू, असा दावा गोपीकिशन बजोरिया यांनी केला आहे.
शिवसेनेकडून नाशिक विधानपरिषदेसाठी नरेंद्र दराडेंच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे, तर कोकणमधून राजीव साबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे भाजप या ठिकाणी उमेदवार देणार का, याकडे लक्ष लागलं आहे.
पुढच्या महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांतून विधानपरिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक होत आहे. निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची 3 मे अंतिम तारीख आहे.
21 मे रोजी मतदान होईल, तर 24 मे रोजी मतमोजणी होईल.
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, उस्मानाबाद-लातूर-बीड , परभणी-हिंगोली, अमरावती आणि चंद्रपूर या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे.
या आमदारांचा कार्यकाळ संपणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल तटकरे (रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग)
राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत जाधव (नाशिक)
राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबा जानी दुर्राणी (परभणी-हिंगोली)
काँग्रेसचे दिलीपराव देशमुख (उस्मानाबाद-लातूर-बीड)
भाजपचे प्रवीण पोटे (अमरावती)
भाजपचे मितेश भांगडिया (वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली)