अहमदनगर : अहमदनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या दुहेरी हत्याकांडाप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक वर्षापूर्वी राजकीय बॅनर लावण्यावरुन झालेल्या वादातून या दोघांची हत्या करण्यात आली, अशी फिर्यात मृताच्या भावाने दिली आहे.


मृत योगेशचा भाऊ कृष्णा याने जामखेड पोलीस स्टेशनला तक्रार दिली. चार ते पाच जणांनी कट रचला आणि योगेश आणि राकेश यांची दुचाकीस्वारांनी गोळीबार करुन हत्या केली, असा दावा करण्यात येत आहे.

दरम्यान, वैयक्तिक वादातून ही हत्या घडली असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. राजकीय बॅनर लावण्यातून हत्या झाली असल्याचा आरोप करण्यात आला असला, तरी तशी कोणतीही नोंद पोलीस स्टेशनला करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांनी दिली.

एका महिन्यात दुसरं हत्याकांड

एका महिन्यात दुसर्‍यांदा दुहेरी हत्याकांड झाल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. केडगाव पाठोपाठ आता जामखेडला अज्ञातांनी राष्ट्रवादीच्या दोन कार्यकर्त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. या दुहेरी हत्याकांडाने नगर पुन्हा हादरुन गेलं आहे.

गोळीबारात राष्ट्रवादी युवकचा जिल्हा सरचिटणीस योगेश आणि राकेश राळेभात यांचा मृत्यू झाला. मृत दोघेही चुलत भाऊ होते. नगरला खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना दोघांचा मृत्यू झाला.

जामखेड मार्केट यार्डला काल साधारणपणे पावणे सात वाजता योगेश आणि राकेश हॉटेलमध्ये बसले होते. यावेळी दुचाकीवर आलेल्या तिघांपैकी दोघांनी खाली उतरुन समोरासमोर बेछूट गोळीबार केला.

सात ते आठ गोळ्या छातीत झाडल्याने गंभीर दुखापत होऊन योगेश आणि राकेश खाली कोसळले. शेजारीच लग्नाच्या डिजेचा दणदणाट असल्याने गोंधळातच गर्दीत गोळ्या झाडल्या. यावेळी काही नागरिकांनी दुचाकीस्वारांना रोखण्याचा प्रयत्न करताच हवेत गोळ्या झाडून मारेकरी फरार झाले.

संबंधित बातमी :

नगरला एका महिन्यात दुसरं दुहेरी हत्याकांड, जामखेड बंदची हाक