बिंदुसरा धरणावर सेल्फी घेताना तरुणाचा पाण्यात पडून मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 24 Sep 2016 06:23 PM (IST)
बीडः बीडमधील बिंदुसरा धरणावर सेल्फी घेण्याचा मोह तरुणाच्या जीवावर बेतला आहे. शेख गाजिक शेख अख्तर या 20 वर्षीय तरुणाचा बिंदुसरा नदीच्या धरणावर सेल्फी घेताना पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.. बिंदुसरा नदीला चार वर्षात पहिल्यांदाच पूर आला आहे. त्यामुळे नागरिक पाणी पाहण्यासाठी बिंदुसरा धरण आणि नदीवर मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. यामध्ये सेल्फी घेण्याचा मोह न आवरता आल्याने अशा घटना घडत आहेत. मराठावाड्यात परतीच्या मुसळधार पावसाने जवळपास सर्वच लघु आणि मध्यम प्रकल्प भरले आहेत. त्यामुळे पाणी पाहण्यासाठी गेल्यानंतर अनेक जण सेल्फी घेतात. मात्र हे सेल्फी जिवावर बेतत आहेत. त्यामुळे धरणावर किंवा कोणत्याही धोकादायक ठिकाणी सेल्फी घेण्याचा मोह आवरणं गरजेचं आहे.