मुंबई : दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या राज्यातील नागरिकांच्या मदतीला शिवसेना धावून आली आहे. दुष्काळग्रस्तांना मदत करण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीवर चर्चा करण्यासाठी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं.


चारा छावण्यांवर मुक्काम करुन राहिलेल्या शेतकरी कुटुंबांना पुढील दहा दिवस पुरेल इतकं अन्नधान्य आणि इतर भोजन साहित्य पोहचवण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. त्यानुसार दुष्काळग्रस्त चारा छावण्या असलेल्या अहमदनगर, सातारा, सोलापूर, सांगली, पुणे, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद आणि जालना या जिल्ह्यांतील सुमारे दोन लाख शेतकऱ्यांना पुढील दहा दिवस पुरेसं धान्य, स्वयंपाकासाठी लागणारे तेल, डाळी, कांदे-बटाटे यासारखं साहित्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

या बैठकीला शिवसेना नेते सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम यांच्यासह मंत्री विजय शिवतारे, दीपक केसरकर, संजय राठोड आणि माजी मंत्री डॉ. दीपक सावंत, आमदार तानाजी सावंत, जयदत्त क्षीरसागर, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होतेत

महाराष्ट्रातील दुष्काळ परिस्थितीची आणि शासनाने हाती घेतलेल्या तातडीच्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर आणि जिल्हाधिकारी मनोज रानडेही उपस्थित होते.