CM Eknath Shinde Dasara Melava 2023 : बाळासाहेब ठाकरे ज्यांना गाडायची भाषा करायचे त्यांना तुम्ही डोक्यावर घेतले. ज्यांना बाळासाहेबांनी नाकारलं त्यांचे तळवे तुम्ही चाटत आहात असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर जोरदार टीका केली. मुंबईतील आझाद मैदानात शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा आयोजीत केला आहे. या मेळ्याव्याला संबोधीत करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी जमलेल्या शिवसैनिकांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. आझाद मैदानावर मेळावा होत आहे याचा आनंद आहे. या आझाद मैदानाला खूप मोठा इतिहास असल्याचे शिंदे म्हणाले. 


एकीकडे बाळासाहेबांचे विचार दुसरीकडे सत्तेसाठी लाचारी


शिवसैनिक जगला काय आणि मेला काय याचे यांना काहीही पडले नसल्याचे म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. आज आपण एकीकडे बाळासाहेबांचे विचार पाहतोय आणि दुसरीकडे सत्तेसाठी लाचारी पाहतोय. बाळासाहेबांचे विचार हेच आमचे शिवतीर्थ आहे. मागच्या वेळी देखील मी शिवतीर्थावर मी दसरा मेळावा करु शकलो असतो, पण शांतता राहावी हा माझा उद्देश आहे. जिथे मोकळेपणाने विचार मांडता येतील तेच आपले शिवतीर्थ असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. उद्धव ठाकरेंनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला तर आश्चर्य वाटायला नको असे एकनाथ शिंदे म्हणाले. ज्यांनी सावरकरांचा अपमान केला त्यांच्याच शेजारी तुम्ही जाऊन बसले आहेत. बाळासाहेब म्हणाले होते, ज्यावेळी माझी शिवसेना काँग्रेस होईल त्यावेळी मी माझे दुकान बंद करेन असे एकनाथ शिंदे म्हणाले. महाराष्ट्रातून आज भगवी लाट आली आहे. सगळ्यांना कळू द्या बाळासाहेबांची शिवसेना कुठे आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.  


नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?


ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा विचार सोडला, ज्या मणिशंकर आय्यरला बाळासाहेब ठाकरेंनी जोडे मारले, त्यांच्यासाठी तुम्ही पायघड्या टाकत आहेत असे एकनाथ शिंदे म्हणाले. शिवसेनेची काँग्रेस झाली तर दुकान बंद करेन असे बाळासाहेबांनी म्हटलं होतं. आता कदाचित उरली सुरली शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन केली तर आश्चर्य वाटायला नको असे शिंदे म्हणाले. बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाशी गद्दारी तुम्ही केली. उद्या एमआयएम ओवेसी सोबत युती करतील. हमास हिजबुल लष्कर ए तोयबा यांच्याशी देखील युती करतील असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. शिवसैनिक जगला काय मेला काय त्याचं यांना काही नाही फक्त माझे कुटुंब माझी जबाबदारी एवढच यांना माहित आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी सुमंत रुईकर पायी चालत होते, त्यावेळी त्यांचा मृत्यू झाला. त्याची उद्धव ठाकरेंनी विचारपूससुद्धा केली नाही. आम्ही त्यांच्या कुटुंबियांना घर दिल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. समाजवादी लोकांशी युती करतायत. साहेबांनी ज्यांना नाकारले त्यांचे तळवे तुम्ही चाटत आहात, महागद्दार कोण हे जनता चांगलं जाणते. सत्तेसाठी कधीच तडजोड केली नाही, करणार नाही. रक्ताचं नाते सांगणाऱ्यांनी हिंदुत्वाचा गळा घोटल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. 


महत्त्वाच्या बातम्या:


महागद्दार ते निर्लज्ज, उद्धव ठाकरेंवर पहिल्यांदा थेट हल्ले, एकनाथ शिंदेंच्याभाषणातील ठळक मुद्दे