Manoj Jarange News : मराठा आरक्षणासाठी (maratha reservation news) मनोज जरांगे यांनी दिलेला अल्टिमेटम आज संपत आहे. त्यामुळे राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (girish mahajan) यांनी त्यांच्याकडे आणखी वेळ मागितला. पण मनोज जरांगे (Manoj Jarange) त्यांच्या मतावर ठाम राहिले. संकटमोचक गिरीश महाजन यांना जरांगे यांनी स्पष्ट शाब्दात आणखी वेळ मिळणार नाही, असे सांगितले. (Manoj Jarange on Maratha Reservation News )


राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे यांना सरकारला थोडा वेळ देण्याची विनंती केली. मात्र, यावर मनोज जरांगे यांनी आता कोणालाही वेळ दिला जाणार नाही. त्यांनीच चाळीस दिवसांचा वेळ घेतलेला आहे. मराठा समाजाने मुख्यमंत्र्यांच्या सन्मान ठेवला आहे, एक महिन्यांपेक्षा अधिक दिवस सरकारला दिले होते. त्यांनी स्वतः वेळ  घेतलेला आहे, त्यामुळे आता वेळ मिळू शकत नाही, असे जरांगे यांनी महाजनांना सांगितले. 


गिरीश महाजन यांनी सांगितले की उपोषणाला बसू नका शरीराला ताण होईल. त्यावर जरांगे त्यांना म्हणाले की, मग आरक्षण द्या मी उपोषणाला बसत नाही असे सांगितले.   चार दिवसात कायदा पारित होत नाही म्हणून वेळ द्या असं गिरीश महाजन यांनी सांगितलं होतं. कायद्याचा आधार घेऊन कायदा पारित करावा लागेल, त्यासाठी एक महिन्याचा वेळ मागितला होता. आम्ही चाळीस दिवस दिले मग आता वेळ कशासाठी पाहिजे. समाज म्हणून आम्ही त्यांना एक तासाचाही वेळ देऊ शकत नाही, तुम्ही आज रात्रीच आरक्षण जाहीर करा, असेही त्यांनी सुनावले आहे.


तुम्ही आम्हाला सुरुवातीलाच म्हणायला पाहिजे होते की आरक्षण देण्यासाठी पन्नास वर्षे लागणार आहेत. मात्र तुम्हीच आम्हाला सांगितले की पंधरा दिवस लागतील त्यानंतर सर्व सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने तीस दिवसाचा वेळ मागितला होता. मग आता वेळ कशासाठी हवा आहे. आत्ता आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार गेवराई तालुक्यातील 66 गावांपैकी 64 गावात कुणबी समाजाचे दाखले निघाले आहेत. याआधी अशी माहिती होती की बीड जिल्ह्यात एकही कुणबी समाजाची नोंद नाही, मात्र आमच्या लोकांनी अभ्यास करून गावागावात माणसे पाठवून ही माहिती गोळा केली आहे. सरकार आम्हाला पागल समजत आहे का? आरक्षण कसे देत नाही तेच आम्ही पाहू, असे जरांगे म्हणाले.


मराठा समाजाला कळकळीची विनंती आहे आत्महत्या करू नका, आरक्षण कसे देत नाही ते आम्ही पाहू, माझ्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी तुम्ही उभे रहा. माणसे कमी होता कामा नयेत, आता आमरण उपोषण सुरू केले जाणार आहे. त्यामध्ये उपचारही घेतले जाणार नाहीत, पाणी घेतले जाणार नाही, टोकाचे उपोषण केले जाणार  असेही मनोज जारांगे पाटील यांनी सांगितले.