हुतात्मा स्मारकावर साधं फूल नाही, त्यापेक्षा काँग्रेस परवडले, राज ठाकरे सरकारवर बरसले
मुंबई : महाराष्ट्र दिनीही शिवसेना-भाजपमधला वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहे. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधन आज भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला आणि शिवसेना भवन परिसरातच भाजपनं ठिकाठिकाणी झेंडे लावले.
प्रत्येक राजकीय मुद्दयावर भाजपला घेरणाऱ्या सेनेविरोधात आता भाजपनंही मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. दादरच्या सेना भवन चौकात भाजपचे झेंडे लावून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला. अनेक राजकीय मुद्द्यांवर शिवसेना भाजपला घेरण्याचा प्रयत्न करते, मात्र आज भाजपनं शिवसेना भवनालाच झेंडे आणि पताकांनी वेढा घातला.
हुतात्म्यांचा विसर :
एकीकडे झेंडावॉर सुरु असताना ज्या 105 हुतात्म्यांनी आपले प्राण देऊन मुंबईसकट संयुक्त महाराष्ट्र अबाधित ठेवला, त्यांचाच सेना-भाजपला विसर पडल्याचं दिसतं आहे. आज मुंबईतल्या हुतात्मा स्मारकावर साधी साफ-सफाईदेखील केली गेली नाही. महत्त्वाचं म्हणजे असं होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
शिवसेना-भाजपच्या एक-दोन नेत्यांनी स्मारकावर हजेरी लावली खरी मात्र, साधं एक फुलही या स्मारकावर वाहिलं गेलं नाही. त्याऐवजी दोन्ही सत्ताधारी आपापल्या नियोजित कार्यक्रमांद्वारे शक्तीप्रदर्शन आणि एकमेकांवर कुरघोडी करण्यात गुंग असल्याचं चित्र दिसलं.
आतापर्यंत प्रत्येक महाराष्ट्र दिनाला याठिकाणी मोठी सजावट केली जायची.. शिवाय सत्ताधाऱ्यांसह विरोधक सर्वच जण आवर्जून उपस्थित राहायचे.
एकीकडे मंत्रालयासह अनेक प्रशासकीय इमारती सजवल्या जात असताना हुतात्मा स्मारकाबद्दल उदासीनता का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.