भाजपची अखंड महाराष्ट्रावर सत्ता, शेलारांनी ठणकावलं
एबीपी माझा वेब टीम | 01 May 2016 03:00 AM (IST)
मुंबई : भाजप महाराष्ट्र दिनाचं राजकारण कधीही करणार नाही, जे राज्याच्या विभाजनाचं राजकारण करु पाहत आहेत, त्यांना विकास हेच उत्तर असेल असं भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ठणकावून सांगितलं आहे. महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत शिवसेना-भाजपमध्ये रंगलेल्या पोस्टर वॉरवर शेलार बोलत होते. भाजपची अखंड महाराष्ट्रावर सत्ता आहे आणि देवेंद्र फडणवीस हे अखंड महाराष्ट्राचेच मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे ज्यांना अखंड महाराष्ट्राने नाकारलं आहे, तेच राजकारण करत असल्याचं सांगत शेलारांनी शिवसेनेला शालजोडीत दिले आहेत. गेल्या काही वर्षात बेस्टची अवस्था त्यांनी काय करुन ठेवली आहे, हे सगळ्या मुंबईने पाहयलय. बेस्ट जगली पाहिजे, चालली पाहिजे, वाचली पाहिजे. सर्व स्तरावर तिचा रुट असला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. गेल्या 15 वर्षात त्यांनी हे केलं असतं, तर बरं झालं असतं, असं म्हणत शिवसेनेवर शेलारांनी निशाणा साधला.