मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. शिवसेना-भाजपही निवडणुकीचा तोंडावर जागावाटपाबाबत आपली भूमिक हळूहळू स्पष्ट करु लागले आहेत. एकीकडे शिवसेनेकडून 50-50 टक्क्यांच्या फॉर्म्युल्यावर दावा केला जात आहे. मात्र युतीचा कोणताही फॉर्म्युला ठरला नसल्याचं भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.


भाजप-शिवसेनेची ज्या जागांवर सत्ता आहे, त्या जागा त्याच पक्षांनी लढवल्या पाहिजेत असं साधरण सूत्र असायला हवं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. भाजपने लोकसभेत 7 जागांवर उमेदवार बदलले, त्यावेळी आम्हाल वेड्यात काढण्यात आलं, मात्र आम्ही त्याठिकाणी यशस्वी झालो, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.


त्याप्रमाणे विधानसभेतही काही जागांवर उमेदवार बदलले गेल्यास हरकत नाही. मात्र ज्याठिकाणी शिवसेना-भाजपची सत्ता आहे, तिथे एकमेकांच्या जागांवर दावा न सांगितल्यास युतीतले बरेच प्रश्न सुटतील, असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं.



त्यामुळे जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा नाराजीनाट्य येत्या काळात पाहायला मिळू शकतं. आगामी निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपचा युतीचा फॉर्म्युला काय असेल ते येत्या काळात स्पष्ट होईल.


महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करणे हे आपलं लक्ष्य असून काँग्रेसच्या पाच कार्याध्यक्षांपैकी एक लवकरच भाजपमध्ये आल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, असे संकेत चंद्रकांत पाटलांनी दिले. काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक आमदार संपर्कात असून त्यातील काही जण याच आठवड्यात राजीनामा देतील असा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.


VIDEO | काँग्रेसच्या पाच कार्याध्यक्षांपैकी एक भाजपमध्ये आला तर कोणाला आश्चर्य वाटायला नको : चंद्रकांत पाटील | ABP Majha


विधानसभा निवडणुकांसाठी सहा महिन्यापेक्षा अधिक काळ असताना राजीनामा दिल्यास पोटनिवडणूक घ्यावी लागते. आता निवडणुकीत साधारण तीन महिने राहिले असल्याने अनेक राजीनामे याच आठवड्यात येतील असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. पराभवानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वाचाच आत्मविश्वास खचला आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामे दिले आहेत. हे सगळं असताना खालच्या लोकांनी काम कसे करायचे, असे म्हणत राहूल गांधींसह ज्येष्ठ नेत्यांवरही निशाणा ही साधला.