मुंबई: औरंगाबाद शहरात 8 जून रोजी होणाऱ्या शिवसेना रॅलीचा टीझर प्रसिद्ध करण्यात आला आहे. औरंगाबाद नाही, संभाजीनगर, मी नाव दिलंय, शिवसेनेनं नाव दिलंय या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणातील वक्तव्याचा वापर या टीझरमध्ये करण्यात आला आहे.


शिवसेनेने जारी केलेल्या टीझरमध्ये बाळासाहेबांच्या जुन्या भाषणातील वक्तव्याचा वापर करण्यात आला आहे. त्यामध्ये औरंगाबाद नाही, संभाजीनगर, मी नाव दिलंय, शिवसेनेनं नाव दिलंय असं बाळासाहेब म्हणताना दिसत आहेत. संभाजीनगर शिवसेना शाखेचा 37 वा वर्धापन दिन सोहळा असंही या टीझरमध्ये सांगितलं आहे. देव...देश...आणि धर्म...हेच शिवसेनेचे मर्म असंही वाक्य या टीझरमधील पोस्टरमध्ये दिसतंय. 


औरंगाबादमध्ये 8 जून रोजी उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. शिवसेनेच्या मराठवाड्यातील पहिल्या शाखेच्या 37 व्या वर्धापनदिनानिमित्त ही सभा आयोजित करण्यात आली आहे. 


मराठवाड्यातील शिवसेनेची पहिला शाखा औरंगाबादेत 8 जून 1985 रोजी स्थापन झाली. त्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या सभेसाठी संपूर्ण मराठवाड्यातील शिवसैनिक उपस्थित राहणार असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात येत आहे. त्यानुसार सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर स्तंभपूजन करून पूजा करण्यात आली आहे. 


राज ठाकरे यांचे भाषण याच मैदानावर 
गेल्या महिन्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांची विराट सभा याच मैदानावर झाली होती. त्यांनी त्यांनी महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर निशाणा साधला होता. आता उद्धव ठाकरे सुद्धा त्याच मैदानावर सभा घेणार आहे. राज यांच्या टीकेला तसेच भाजपकडून करण्यात येणाऱ्या टीकेला आता उद्धव ठाकरे काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.