नागपूर : अवैध फेरीवाल्यांच्या गुंडगिरीचा अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार नागपुरात समोर आला आहे. शहरातील सर्वात प्रमुख आणि अत्यंत गजबजलेल्या सिताबर्डी बाजारपेठेत मुख्य रस्त्यावर फेरीवाल्यांनी एका महिलेला आणि तिच्या पतीला बेदम मारहाण केली.


20 फेब्रुवारी रोजी भर दुपारी घडलेला हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. अनेक अवैध फेरीवाले पुजा सोनकुसरे आणि तिचे पती अंकेश यांना मारहाण करतानाची दृष्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत.

पुजा यांनी सीताबर्डी बाजारपेठेत रस्त्यावर उभे असलेल्या फेरीवाल्याकडून कपडे ( under garments ) खरेदी केले होते. मात्र, ते अपेक्षेप्रमाणे नसल्यामुळे पुजा आपल्या पतीसह ते बदलून घेण्यासाठी 20 फेब्रुवारीला दुपारी पुन्हा त्याच ठिकाणी गेल्या. फेरीवाल्याने खरेदी केले कपडे बदलून देण्यासाठी अतिरिक्त पैशांची मागणी केली.

यानंतर फेरीवाले आणि पुजा यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्याच दरम्यान काही फेरीवाल्यांनी अंतरवस्त्रांच्या नावाने अश्लील शेरेबाजी सुरु केली. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या पुजा यांनी तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतला. पुजा रस्त्यावर उभी असलेल्या पतीच्या दुचाकीवर बसू लागल्या. तेवढ्यातच फेरीवाल्याने पाठीमागे येत पुजाला भिकारी संबोधलं आणि अंकेश सोनकुसरे यांना जोरदार धक्का मारला.

पतीला वाचवण्यासाठी पुजा समोर जाताच फेरीवाल्याने पुजा यांना मारहाण सुरु केली. पत्नीला मारहाण होताना पाहून अंकेश समोर गेले असता अनेक फेरीवाले त्यांच्यावर तुटून पडले आणि जबर मारहाण केली. एका फेरीवाल्याने त्यांना पोटाच्या खालीही मारलं, असा दावा पुजा यांनी केला आहे.

घाबरलेल्या सोनकुसरे दाम्पत्याने त्वरित 100 नंबर डायल करत पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. एकानंतर एक तीन कॉल केले. मात्र, पोलीस बरेच उशिरा आले. अखेर पुजा आणि अंकेश यांनी हाकेच्या अंतरावर असलेलं सिताबर्डी पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरुवातीला पोलिसांनीही तक्रार घेण्यास नकार दिल्याचा आरोप या दाम्पत्याने केला.

तुम्ही हा वाद आपापसात मिटवा, आम्ही तुमचे पैसे परत मिळवून देतो, अशी मांडवलीची भाषा काही पोलिसांनी केली. मात्र सोनकुसरे दाम्पत्य त्यांच्या तक्रारींवर कायम राहिलं आणि त्यांनी वरिष्ठांकडे धाव घेतल्याने रात्री 11 वाजता सिताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये फेरीवाल्यांविरोधात मारहाण, विनयभंग असे गुन्हे नोंदवण्यात आले.

दरम्यान, पोलिसांना याबद्दल एबीपी माझाने जाब विचारला असता अजब उत्तर मिळालं. एवढ्या किरकोळ प्रश्नांचीही कशाला बातमी करता, असं म्हणत पोलिसांनी टोलवाटोलवी केली.