पुणे : बारावी इंग्रजीचा पेपर पुन्हा घेतला जाणार नाही, असं स्पष्टीकरण बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिलं आहे. पेपर सुरू झाल्याच्या दीड तासानंतर हे फोटो बाहेर आल्याने याला पेपर फुटला असं म्हणता येणार नाही. या प्रकरणाची गैरप्रकार म्हणून नोंद घेतली जाईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील तांबेवाडीच्या आश्रमशाळेत हा प्रकार घडला होता. इंग्रजीचा पेपर सुरु झाल्यानंतर प्रश्नपत्रिकेचे फोटो तासाभरातच व्हायरल झाले होते. त्यानंतर बोर्डाकडून हे स्पष्टीकरण दण्यात आलं आहे.

शकुंतला काळे नेमकं काय म्हणाल्या?

''पेपर सुरू झाल्याच्या दीड तासानंतर हे फोटो बाहेर आल्याने याला पेपर फुटला असं म्हणता येणार नाही. या प्रकरणाची गैरप्रकार म्हणून नोंद घेतली जाईल. या फोटोत दिसणारे काही प्रश्न हे इंग्रजीच्या पेपर मधले होते. या प्रकाराच्या मागे जे आहेत त्यांचा शोध घेतला जाईल. वेळ पडल्यास सायबर पोलिसांकडेही तक्रार दाखल करण्यात येईल. मुलांनी आणि पालकांनी घाबरून न जाता व्यवस्थित परीक्षा द्यावी. हा पेपर पुन्हा घेतला जाणार नाही,'' असं स्पष्टीकरण शकुंतला काळे यांनी दिलं.

कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रत्येक जिल्ह्यात पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. शिवाय जिल्हाधिकाऱ्यांनाही याबाबत सूचना देण्यात येतील, असं आश्वासन शकुंतला काळे यांनी दिलं. कॉपी करतानाचा व्हिडीओ समोर आला होता, त्यावर शकुंतला काळे यांनी ही प्रतिक्रिया दिली.

बारावाची निकाल वेळेवर लागेल

कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. मात्र शिक्षकांचं निवेदन मिळाल्यानंतर ते सरकारकडे पाठवलं जाईल. निकाल उशिरा लागणार नाही. शेवटी विद्यार्थीही त्या शिक्षकांचेच आहेत, असं शकुंतला काळे म्हणाल्या.

संबंधित बातम्या :

बारावीचा पेपर फुटला, तासाभरातच प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर