पुणे : देव दगडात नसून माणसात आहे, अशी शिकवण संतांनी आपल्याला दिली आहे. परंतु देशातील अनेक माणसं किड्या-मुंग्यांप्रमाणे मरत आहेत, अशा परिस्थितीत सरकार केवळ मंदिराच्या मुद्द्यावरुन राजकारण करत आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी अगोदर माणसांकडे पहावे, त्यानंतर मंदिराकडे लक्ष द्यावे, असा सल्ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला दिला आहे.


राज्यात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र त्यावरील लक्ष वळवण्यासाठी मंदिराचा मुद्दा, दंगली असे प्रकार जाणीवपूर्वक केले जात आहेत. असा आरोप खासदार राजू शेट्टी यांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे. बारामती येथील जिल्हा व सत्र न्यायालयात आंदोलनातील खटल्यातील सुनावणीसाठी खासदार राजू शेट्टी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला.

शेट्टी म्हणाले की, महाराष्ट्रात सामान्य माणसांची अवहेलना होत आहे. साखर आयुक्तपदी तुकाराम मुंडे यांच्या नियुक्तीला सरकारचाच विरोध आहे. मतांच्या धृविकरणासाठी दंगली घडवणे ही भाजपची खासियत आहे, हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे काहीही झाले तरी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची राज्यातील सत्ता जाणारच आहे.

मराठा समाजाची फसवणूक करु नका

मराठा आरक्षणाबाबत बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, शेतकरीबहुल असलेल्या मराठा समाजासह अन्य समाजांची आर्थिक दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे त्यांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळायलाच हवे. परंतु शासनाने त्यांची फसवणूक होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.