Ashadhi Wari 2023 : आषाढ वारी सोहळ्यासाठी बेळगाव (Belgaon) जिल्ह्यातील अंकली (Ankali) इथून श्रीमंत शितोळे सरकार यांच्या माऊलींचा अश्व मोती आणि जरी पटक्याचा अश्व हिरा अशा या मानाच्या अश्वांच्या अंकली ते आळंदी (Alandi) अशा 300 किमी प्रवासाला सुरुवात झाली आली. हे अश्व अंकली ते आळंदी हा पायी प्रवास करुन 10 जून रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आळंदीत दाखल होतील. 29 जून रोजी आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आहे.


शितोळे घराण्याकडे 190 वर्षांपासून माऊलीच्या अश्वाची परंपरा


अंकली येथील शितोळे घराण्याकडे 190 वर्षांपासून माऊलीच्या अश्‍वाची परंपरा आहे. या परंपरेनुसार आषाढी वारीसाठी शितोळे घराण्याचे मानाचे अश्‍व अंकलीकडे प्रस्थान करतात. हैबतबाबा आरफळकर यांनी आषाढी वारीतील पालखी सोहळ्यास विशेष महत्त्व मिळवून दिले. यावेळी माऊलीच्या अश्वाचा व माऊलीच्या तंबूचा मान शितोळे घराण्याकडे आला. पिढ्या-दर-पिढ्या चालत आलेली परंपरा सध्या श्रीमंत ऊर्जितसिंह राजे शितोळे सरकार व त्यांचे पुत्र महादजीराजे शितोळे सरकार हे निष्ठेने चालवत आहेत. माऊलींच्या पालखी सोहळ्यात रोज पहाटे 4 वाजता अश्वास निमंत्रण द्यायला चोपदार जातात. त्यानंतर साडेपाच वाजता हा अश्व दर्शनासाठी माऊलींच्या पादुकांजवळ येतो. त्यावेळी त्याच्या गळ्यात पुष्पहार घातला जातो. तिथून तो पुढे चालण्यास मार्गस्थ होतो.


पूजन करुन अश्वांना निरोप


अंकलीकर शितोळे सरकार यांच्या राजवाड्यात काल (31 मे) सकाळी दहा वाजता अंबाबाई मंदिरात पूजन आणि आरती करण्यात आली. जरीपटक्याचे पूजन करण्यात आले. दोन्ही अश्वांचे श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे सरकार आणि महादजी राजे शितोळे सरकार यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. दिंडी आणि दोन्ही अश्व राजवाड्याबाहेर येताच भाविकांनी पाणी घालून ओवाळणी केली आणि दर्शन घेतले. गावातील पारंपारीक मार्गावरुन ही मिरवणूक वेशीत आल्यानंतर अश्वांना निरोप देण्यात आला. 


अश्वांचा प्रवास मार्ग


अंकलीहून प्रस्थान झाल्यानंतर हे अश्व 31 मे रोजी मिरज, 1 जून रोजी सांगलवाडी, 2 जून रोजी इस्लामपूर पेठनाका, 3 जून रोजी वहागाव, 4 जून रोजी भरतगाव, 5 जून रोजी भुईंज, 6 जून रोजी सारोळा, 7 जून रोजी शिंदेवाडी, 8 आणि 9 जून रोजी पुणे आणि 10 जून रोजी आळंदीत पोहोचून माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी होतील, असे श्रीमंत सरदार महादजीराजे शितोळे सरकार अंकलीकर यांनी सांगितले.


हेही वाचा


Ashadhi Wari 2023 : संत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी 'सोन्या-खासदार' अन् 'राजा- सोन्या' बैलजोडीला मान; बैलजोडीची निवड नेमकी कशी केली जाते?